“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:07 IST2025-11-14T16:00:01+5:302025-11-14T16:07:46+5:30
Bihar Election 2025 Result: बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे सगळे कल हाती आल्यानंतर आता विरोधकांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
Bihar Election 2025 Result:बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सुरुवातीला जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएची वाटचाल आता २०६ जागांच्या दिशेने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महागठबंधन अवघ्या ३० जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यानंतर आता विरोधकांकडून एनडीए, भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली जात आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणार कामरा याने निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला.
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. भाजपाने आता निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे तोंड गोड केले पाहिजे. तीन महिन्यांपूर्वीच म्हणालो होतो की, ही निवडणूक भाजपाने पळवली आहे. केवळ ज्ञानेश कुमार यांनी विजयाचे प्रमाणपत्र पंतप्रधान मोदींना दिले आहे. ८० लाख मतदार ज्या राज्यातून वगळले आहेत, ५ लाख दुबार मतदार आहेत, त्या राज्यातील निकाल काय असतील? याचा विचार केला पाहिजे, अशी टीका सिंह यांनी केली.
निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा
कुणाल कामरा याने एक्सवर पोस्ट शेअर करत निवडणूक आयुक्तांवर टीका केली आहे. ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा. तिथेही भाजपाचे सरकार स्थापन होईल, असे कामरा याने म्हटले आहे. दुसरीकडे, पराभव झाला आहे हे मान्य केले पाहिजे. त्यात काही दुमत असण्याचे कारण नाही. भाजपाने सत्तेचा गैरवापर केला आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यासाठी लावलेला वेळ हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचे जागावाटप झाले, त्यात अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशीपर्यंत चालले होते. राहुल गांधींची मतचोरीबाबतची यात्रा होती तिला मिळालेला प्रतिसाद पाहून तेजस्वी यादव यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करणे फायद्याचे ठरले असते, असे मत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार, एनडीएत घटक पक्ष असलेल्या भाजपाचे ९५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षाचे ८५ उमेदवार आघाडीवर आहेत. महागठबंधनचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे २४ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर आहे.