"मतदारांनी २०० रुपयांना मत विकले"; बिहार निकालावर प्रशांत किशोर यांचा संताप; 'जन सुराज'चा धक्कादायक पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:24 IST2025-11-14T12:12:48+5:302025-11-14T12:24:37+5:30
बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मोठं अपयश मिळालं आहे.

"मतदारांनी २०० रुपयांना मत विकले"; बिहार निकालावर प्रशांत किशोर यांचा संताप; 'जन सुराज'चा धक्कादायक पराभव
Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत महागठबंधन पिछाडीवर आहे. तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल ३५ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला दोन अंकी आकडा देखील गाठता आलेला नाही. दुसरीकडे जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाची कामगिरी फक्त निराशाजनकच नव्हती, तर त्यांनी ज्या भाकितावर आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली होती, तीही पूर्णपणे चुकीची ठरली आहे. अशातच प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने मतदारांवर आणि निवडणुकीच्या निकालावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे.
जन सुराजने केलेल्या एका पोस्टमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मतदारांनी आपले मत विकल्याचा थेट आरोप या पोस्टमधून करण्यात आला आहे. "ही निवडणूक १० हजार रुपयांची निवडणूक ठरली. आम्ही आमचे मत केवळ ₹२००/महिना भावात विकले. आपले मत याहून कितीतरी अधिक मौल्यवान आहे, हे आपण कधी समजून घेणार?" असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ये चुनाव 10 हज़ारी चुनाव साबित हुआ। हमने अपने वोट महज़ 200/महीने रुपये के लिए बेच दिए। हम कब समझेंगे कि हमारा वोट इससे कहीं ज़्यादा कीमती है।
— ThePoliTechs (@ForSuraaj) November 14, 2025
या विधानाद्वारे प्रशांत किशोर यांनी थेट बिहारमधील मतदारांनी तात्पुरत्या फायद्यासाठी मत दिल्याचे म्हटलं आहे. तसेच या निवडणुकीत विकासाऐवजी पैसे घेऊन मतदान करण्याची प्रवृत्ती दिसून आल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.
बिहारच्या जनतेने प्रशांत किशोर यांच्यावर विश्वास ठेवला नाही. जनसुराज पक्ष निकालाच्या ट्रेंडमध्येही दिसत नाही. सध्या सकाळी ११:३० वाजेपर्यंत, जनसुराज पक्षाचे उमेदवार बिहारमधील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये पिछाडीवर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत प्रशांत किशोर यांना मोठा धक्का बसला आहे. प्रशांत किशोर यांचा पक्ष एकाही जागेवर आघाडी घेऊ शकलेला नाही.
जनसुराज पक्षाची अवस्था इतकी वाईट आहे की मतदानाच्या टक्केवारीत ते मागे आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर निकाल यादीतूनही जनसुराज पक्ष गायब होता. चनपटिया येथून मनीष कश्यप आणि कारगहर येथून रितेश पांडे हे देखील पिछाडीवर आहेत. दरम्यान, मधुरा येथून जनसुराज पक्षाचे उमेदवार नवीन कुमार सिंह उर्फ अभय सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.