"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:03 IST2025-11-06T15:02:36+5:302025-11-06T15:03:40+5:30
श्वेता गेल्या एक महिन्यापासून अभ्यास सोडून प्रचार करत आहे.

"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. याच दरम्यान पाटणा जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय असलेला दानापूर विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजद उमेदवार आणि विद्यमान आमदार रीतलाल यादव जेलमध्ये आहेत, परंतु त्यांची मुलगी श्वेताने संपूर्ण निवडणूक प्रचाराची जबाबदारी घेतली आहे.
रिपोर्टनुसार, श्वेता गेल्या एक महिन्यापासून अभ्यास सोडून प्रचार करत आहे. एबीपी न्यूजशी बोलताना ती म्हणाली, "माझे वडील नेहमीच निवडणूक लढवत असत, पण मला कधीही त्यात सहभागी होण्याची गरज वाटली नाही. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की, मला त्यांच्यासाठी मतं मागावी लागत आहेत. गेल्या महिन्यापासून माझा अभ्यास पूर्णपणे थांबला आहे आणि मी मतदारांना भेटण्यासाठी घरोघरी जात आहे."
"वडिलांनी मतदारसंघात खूप काम केलं"
आमदार रितलाल यादव यांची मुलगी श्वेता म्हणाली की, जेव्हा ती प्रचारासाठी बाहेर पडली तेव्हा तिला तिच्या वडिलांनी मतदारसंघात केलेल्या कामाबद्दल कळलं. आम्हाला माहितही नव्हतं की त्यांनी इतकं काम केलं आहे. जेव्हा आम्ही घराबाहेर पडलो तेव्हा लोकांनी आम्हाला सांगितलं की रस्ते, शाळा आणि डायरा प्रदेशाच्या विकासात त्यांनी किती योगदान दिलं आहे. वडिलांनी मतदारसंघात खूप काम केलं"
"जनतेने मतदान करावं"
श्वेताने जनतेला घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तिने सांगितलं की, माझ्या पप्पांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. आता त्यांना न्याय मिळवून देणं हे जनतेच्या हातात आहे. जनतेला बदल हवा आहे आणि तेजस्वी यादव यांच्या योजनांनी प्रभावित झाली आहे. मला विश्वास आहे की माझे वडील यावेळी जिंकतील. श्वेताने जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.