Bihar Election 2025: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनेही देत आहेत. अशातच, राजद (RJD) मधून बाहेर काढल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी स्वतःचा नवा राजकीय पक्ष ‘जनशक्ति जनता दल (JJD)’ स्थापन केला आहे. या नव्या पक्षाच्या “ब्लॅकबोर्ड” या निवडणूक चिन्हासह ते यंदा महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
महुआतील प्रचारात जोर
प्रचारादरम्यान तेज प्रताप यादव यांनी एक मोठे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, “महुआमध्ये आमची टक्कर कोणाशीही नाही. जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आम्ही महुआला मेडिकल कॉलेज दिले, आता विजयानंतर इथे इंजिनिअरिंग कॉलेजही उभारू. तसेच आम्ही इथे क्रिकेट स्टेडियम उभारुन भारत-पाकिस्तान सामना देखील आयोजित करू. महुआमध्ये मीच सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार आहोत. माझे ध्येय केवळ राजकारण नाही, तर विकासाचे नवे मॉडेल उभे करणे आहे.”
‘तेजस्वी जननायक नाहीत’
तेज प्रताप यादव यांनी आपल्या भाऊ आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला करत म्हटले की, “जननायक कोण हे आत्ताच सांगू शकत नाही, पण लोहियाजी, कर्पूरी ठाकूर आणि लालू प्रसाद यादव हे खरे जननायक आहेत. तेजस्वी अजून जननायक नाहीत, कारण ते आपल्या बळावर नाहीत, तर आमच्या वडिलांच्या बळावर आले आहेत. ज्या दिवशी ते स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे येतील, त्या दिवशी मी सर्वप्रथम त्यांना जननायक म्हणेन.”
‘लालटेन युग’ संपल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘LED विरुद्ध लालटेन’ वक्तव्यावर तेज प्रताप यादव म्हणाले की, “एलईडी आमच्या गाडीमध्येही आहे. लालटेन युग संपले की नाही, हे लालटेनवाल्यांनाच ठरवू द्या. मी आता आरजेडीमध्ये नाही." राजदमधून बाहेर काढल्यानंतर पुन्हा पक्षात पद मिळाल्यास काय कराल, या प्रश्नावर तेज प्रताप म्हणाले की, “मला पदाची लालसा नाही. आरजेडीने आम्हाला कोणतेही पद दिले तरी नाकारेन. मी कधीही कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही. स्वबळावर राजकारण करू.”
दरम्यान, बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 6 नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होईल.
Web Summary : Tej Pratap Yadav, contesting from Mahua, promises a cricket stadium hosting India-Pakistan matches if elected. He criticizes brother Tejashwi, asserting his own political path, and dismisses RJD offers. Bihar elections are scheduled for November.
Web Summary : महुआ से चुनाव लड़ रहे तेज प्रताप यादव ने जीतने पर भारत-पाकिस्तान मैच के लिए क्रिकेट स्टेडियम का वादा किया। उन्होंने भाई तेजस्वी की आलोचना की और राजद के प्रस्तावों को खारिज कर दिया। बिहार में चुनाव नवंबर में हैं।