Bihar Election 2025 :बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाहाबिहारच्या दौऱ्यावर गेले आहेत. रविवारी(30 मार्च) पाटणा येथील बापू सभागृहात आयोजित विविध योजनांच्या उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमारही उपस्थित होते. कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, दोनदा चूक झाली, आता पुन्हा ती होणार नाही.
कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणतात, पूर्वी बिहारमध्ये गुंडराज होते, पण आमच्या सरकारने ते संपवले. आज लोक रात्री उशिराही न घाबरता रस्त्यावर फिरू शकतात. कोसीसह अनेक प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. बिहारमध्ये आता खूप चांगले काम होत असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.
बिहारमध्ये 24 नोव्हेंबर 2005 रोजी आम्ही सत्तेत आलो, पण त्यावेळी राज्याची काय स्थिती होती. सायंकाळनंतर कोणीही घराबाहेर पडत नसायचे. यापूर्वीच्या सरकारांनी काहीही केले नाही. लोकांना फक्त हिंदू आणि मुस्लिमांच्या नावावर लढायला लावले. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात विस्तार नव्हता, लोकांवर योग्य उपचाराची व्यवस्था नव्हती. जेव्हापासून आमचे सरकार आले, तेव्हापासून आम्ही संपूर्ण यंत्रणा सुरळीत करत आहोत. मी यापूर्वी दोनदा चूक केली, पण आता ते होणार नाही, असेही नितीश कुमारांनी म्हटले.
अमित शाहांची लालू प्रसाद यादवांवर टीकाकार्यक्रमादरम्यान अमित शाहा यांनी लालू प्रसाद यादव यांच्याकडे बिहारमध्ये केलेल्या कामाचा हिशेब मागितला. ते म्हणाले की, लालू यादव यांनी काही केले असेल तर सांगावे. मोदी सरकारच्या काळात बिहारमध्ये कृषी क्रांती झाली. यावेळी शाहांनी बिहारमधील लालू-राबरी राजवटीत जंगलराजच्या कालखंडाची आठवण करून दिली. तसेच, 2025 मध्ये एनडीएच्या प्रचंड विजयाचा नारा देत त्यांनी मोदी आणि नितीश यांच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा बिहारमध्ये सरकार स्थापन करेल असा दावा केला.