Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. अशातच, पीएम मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर आता, काँग्रेसकडून पीए मोदी आणि त्यांच्या मातोश्रीचा Ai व्हिडिओ बनवण्यात आला आहे.
बिहारकाँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला आहे. भाजपने या व्हिडिओवर तीव्र आक्षेप व्यक्त करत आहेत. भाजपने या व्हिडिओसाठी थेट राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींच्या इशाऱ्यावरुन मोदींच्या आईचा अपमान केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
शाहनवाज हुसेन यांचा काँग्रेसवर निशाणा
भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणाले की, काँग्रेस पक्ष निर्लज्जपणाच्या मार्गावर गेला आहे. आधी काँग्रेसच्या मंचावरुन पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ करण्यात आली आणि आता एआय व्हिडिओ बनवून अपमान केला. पंतप्रधानांच्या आई या जगात नाही, त्यांच्याबद्दल असा व्हिडिओ बनवणे अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षाने हे थांबवावे. बिहारमधील जनता त्या आईच्या अपमानाचा बदला नक्कीच घेईल, अशी टीका हुसेन यांनी केली.
या एआय जनरेटेड व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणतात, राहुल गांधी अत्यंत खालच्या पातळीवर गेले आहेत. ज्याप्रमाणे ते स्वतःच्या आईचा अनादर करतात, तर ते दुसऱ्याचही आदर कसा करू शकतात? अशा प्रकारे पीएम मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ तयार केल्याने फसवणुकीचा खटला, चौकशी आणि कायदेशीर शिक्षा व्हायला पाहिजे.
जेडीयूचा हल्लाबोल
जेडीयूनेही या व्हिडिओवरून काँग्रेसवर निशाणा साधला. जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, काँग्रेस पक्ष राजकारणात मानसिक पूर्वग्रहाने ग्रस्त आहे. पितृपक्षादरम्यान कृत्रिम व्हिडिओ बनवून अशा प्रकारच्या टिप्पण्या करणे हे पूर्वजांचा अपमान आहे. काँग्रेस निर्लज्जतेच्या शिखरावर पोहोचली आहे. ही माता सीतेची भूमी आहे. या भूमीवर कोणी आई-मुलीचा अपमान केला तर बिहार ते सहन करणार नाही.