Bihar Crime: बिहारमधून तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील आराह जंक्शन येथे रेल्वे स्थानकावर तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने आधी एका तरुणीला आणि तिच्या वडिलांना गोळी मारली. त्यानंतर आरोपीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने आरा स्थानकात गोंधळ उडाला होता. माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
बिहारच्या आराह रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या फूट ओव्हर ब्रिजवर मंगळवारी एका तरुणाने एका तरुणीसह दोघांवर गोळ्या झाडल्या. दोघांची हत्या केल्यानंतर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरा स्थानकात घबराट पसरली. मुलगी वडिलांसोबत फलाट क्रमांक दोनवर जात असताना तरुणाने गोळीबार केला. तिघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात ब्रिजवर पडले होते.
या घटनेनंतर घटनास्थळी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळावरून शस्त्र जप्त केले. त्यानंतर तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी मृतांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला.तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
वरिष्ठ पोलिस अधीक्षक परिचय कुमार यांनी या घटनेची माहिती दिली. "मृत मुलीचे वय १६ ते १७ वर्षांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर गोळी झाडणाऱ्या तरुणाचे वय २२ ते २४ वर्षे आहे. ही तरुणी दिल्लीला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृतांची ओळख पटवली जात आहे. हे सर्व आरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. जीआरपी आणि आरपीएफची टीमही तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येचे कारण व इतर बाबी स्पष्ट होतील," वरिष्ठ पोलिस अधीक्षक परिचय कुमार यांनी सांगितले.
अनिल कुमार त्यांच्या मुलीसह रेल्वे स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी जात होता. त्यानंतर अचानक भोजपूर जिल्ह्यातील उदवंत नगर पोलिस स्टेशन परिसरात राहणारा शत्रुघ्न सिंह यांचा मुलगा अमन कुमार तेथे पोहोचला आणि त्याने गोळीबार सुरू केला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अमनने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांनी याची माहिती दिली. मृतांचे नातेवाईकही रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर आक्रोश पाहायला मिळाला.