बिहारच्या बेगुसरायमधून एक अनोखी आणि भावनिक घटना समोर आली आहे. येथे एका किन्नर (ट्रान्सजेंडर) तरुणाने लिंग परिवर्तन करून आपल्या प्रियकरासोबत लग्न केले. मात्र, आता तिचा पती तिला सोडून दुसऱ्या किन्नरच्या अथवा ट्रान्सजेंडरच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे.
असं आहे संपूर्ण प्रकरण... -येथील साहेबपूर कमाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबू राही गावातील रहिवासी सनी यादवची २०१७ मध्ये त्याच्याच गावातील पियुष यादवशी मैत्री झाली होती. या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. दोघेही सोबत येण्याचा विचार करू लागले. मात्र हे दोघेही मुले होती, यामुळे समाजात एकत्र राहण्यासाठी, सनीने २०१९ मध्ये लिंग परिवर्तन केले आणि मारिया यादव झाली. यानंतर या दोघांनी २०२१ मध्ये गोरखपूरमधील न्यायालयात लग्न केले.
पियुष कोलकात्याला गेला अन्... - लग्नानंतर सर्व काही सुरळित सुरू होते. मात्र, पियुष फेब्रुवारी २०२४ मध्ये कोलकात्याला गेला. तेथे त्याची ओळख सुमन नावाच्या एका ट्रान्सजेंडरसोबत झाली. यानंतर तो मारियाकडे दुर्लक्ष करू लागला. मारियाचा आरोप आहे की, ती पियुषला आर्थिक मदत करत राहिली. मात्र, त्याने तिला ब्लॉक केले आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.
...अन् दोघांनीही एकत्र राहण्याचे मान्य केले - -यानंतर मारियाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर, पोलिसांनी कारवाई करत पियुषचा शोध घेतला. यासंदर्भात बोलताना डीएसपी नेहा कुमारी म्हणाल्या, दोघांनाही समुपदेशनासाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत स्टॅम्प पेपरवर समेट घडवून आणण्यात आला आहे. आता दोघांनीही एकत्र राहण्याचे मान्य केले आहे.