महाआघाडीत मध्यस्थीसाठी अशोक गहलोतांची धाव, एकतेचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 08:32 IST2025-10-23T08:31:10+5:302025-10-23T08:32:14+5:30
राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी अनेक जागांसाठी केले दुहेरी अर्ज दाखल

महाआघाडीत मध्यस्थीसाठी अशोक गहलोतांची धाव, एकतेचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणाः बिहार महाआघाडीत जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत हे 'शांतिदूत' बनले आहेत. त्यांनी लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राबड़ी देवी यांची भेट घेऊन गठबंधनात मतभेद मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
गहलोत यांनी भेटीनंतर स्पष्ट केले - "आठ-दहा जागांवर दोस्ताना संघर्ष होऊ शकतो, पण हे सर्व राज्यांत घडते. महाआघाडी एकजुट आहे, आणि आमचा उद्देश एनडीएला सत्तेबाहेर ठेवणे हा आहे."
सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चेत जागावाटपाबरोबरच प्रचार रणनीती आणि संयुक्त जाहीरनामा यावरही चर्चा झाली. काँग्रेसने राजदला स्पष्ट संदेश दिला की गठबंधनाच्या एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, अन्यथा विरोधकांना त्याचा फायदा मिळू शकतो.
दरम्यान, काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनीही तेजस्वी यादव यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून एकतेचा पुनरुच्चार केला. गुरुवारी पटना येथे महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, त्यात सर्व मतभेदांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गहलोत यांच्या प्रयत्नांमुळे तणावात अडकलेल्या महाआघाडीत पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. राज्यातील २४३ विधानसभा जागांसाठी महाआघाडीचे एकूण २५६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राजदने १४३ जागांवर उमेदवार उभे केले असून मित्रपक्षांसाठी १०० जागा सोडल्या आहेत. काँग्रेसनेही त्यांच्या पसंतीनुसार ६१ जागा निवडल्या. भाकप आणि माकपव्यतिरिक्त व्हीआयपी पक्षाने १५ उमेदवार उभे केले आहेत; परंतु अनेक मतदारसंघांत हे पक्ष आमने-सामने आहेत.
मतदारसंघातील अशी आहे स्थिती...
सिकंदरा, कहलगाव, सुलतानगंज आणि नरकटियागंज या पाच जागांवर राजद आणि काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा. चैनपूर आणि बाबूबाढी या जागांवर व्हीआयपी आणि राजदमध्ये मतभेद आहेत. बछवारा, कारगहर, बिहार शरीफ आणि राजापाकर या चार जागांवर काँग्रेस आणि भाकपमध्ये तीव्र स्पर्धा आहे.
'ज्यांचा पक्ष भक्कम त्यांनाच पाठिंबा'
जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजप्रताप यादव यांनी निवडणुकीनंतर आपल्या पक्षाच्या संभाव्य पाठिंब्याबद्दल बोलताना जो पक्ष निवडणुकीनंतर भक्कम ठरेल, त्याच पक्षाला पाठिंबा असेल, असे जाहीर केले. महुआ मतदारसंघातून ते लढत असून, पाटण्यात त्यांनी सांगितले की, केवळ निवडणूक आहे म्हणून मी महुआला जात आहे, असे नाही. तेथील लोकांशी माझा सतत संपर्क आहे.