कानपूरमध्ये हेअर ट्रान्सप्लांटच्या सर्जरीनंतर दोन इंजिनिअरच्या मृत्यूमुळे डॉ. अनुष्का तिवारी वादात सापडली आहे. दोन्ही इंजिनिअरच्या कुटुंबियांनी मृत्यूसाठी डॉक्टरला जबाबदार धरलं आहे. याच दरम्यान आता पोलीस तपासात एकामागून एक अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. तपास जसजसा पुढे जात आहे तसतसं अनुष्का तिवारीचं खोटे उघड होत आहेत.
अनुष्काकडे MBBS ची डिग्री नाही आणि ती डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करत असल्याचं समोर आलं आहे. तपासात असंही आढळून आलं की, तिच्याकडे कोणताही ट्रेंड असिस्टेंट देखील नव्हता. या दोन्ही प्रकरणांचा खुलासा झाल्यापासून अनुष्का तिवारी तिच्या पतीसह फरार आहे. तिला अटक करण्यासाठी पोलीस तिचा शोध घेत आहेत.
अनुष्का तिवारीचं क्लिनिक कानपूरच्या केशव नगर भागात आहे. दोन खोल्यांमध्ये एक क्लिनिक उघडलं होतं. डेंटल, हेअर आणि एस्थेटिक्स असं बाहेरच्या बोर्डवर लिहिलेलं होतं. पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा हे सर्व दावे खोटे असल्याचं आढळून आलं. तिला सर्जरीचा कोणताही अनुभव नाही. त्याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे तिच्याकडे मेडिकल स्टाफ किंवा सर्जिकल असिस्टेंट्स नव्हते.
एसीपी अभिषेक पांडे म्हणाले की, पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की ती फक्त बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) पास आहे. कायदेशीररित्या बीडीएस डॉक्टर हेअर ट्रान्सप्लांट करू शकत नाहीत किंवा ते स्वतःला डर्मेटोलॉजिस्ट म्हणू शकत नाहीत. या प्रकरणात आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे अनुष्का तिवारीचा पती सौरभ तिवारी देखील तिच्यासोबत क्लिनिकमध्ये बसायचा. सौरभ तिवारी हा MDS आहे, पण प्लास्टिक सर्जन किंवा डर्मेटोलॉजिस्ट नाहीत. असं असूनही तो या सर्जिकल क्लिनिकचा देखील एक भाग होता.