अतुल सुभाष आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; पत्नी निकिता सिंघानिया आणि सासू-सासऱ्यांनाही जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 19:57 IST2025-01-04T19:56:06+5:302025-01-04T19:57:09+5:30
अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आथा कोर्टाने त्यांच्या पत्नी आणि सासू -सासऱ्यांना जामीन मंजूर केला आहे.

अतुल सुभाष आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; पत्नी निकिता सिंघानिया आणि सासू-सासऱ्यांनाही जामीन
काही दिवसापूर्वी बंगळुरु येथील अतुल सुभाष या अभियंत्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणी त्यांची पत्नी निकिती सिंघानिया आणि सासू -सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली. याबाबत आता कोर्टातून मोठी अपडेट समोर आली आहे. पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग सिंघानिया यांना बेंगळुरू सिटी सिव्हिल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
उत्तर प्रदेशातील ३४ वर्षीय एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या मृत्यूप्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली होती. निकिता सिंघानियाला हरयाणातील गुरुग्राम येथून अटक करण्यात आली, तर तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आले. बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, तिघांनाही डिसेंबरच्या सकाळी अटक करण्यात आली आणि स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
अतुल सुभाष यांचा मृतदेह ९ डिसेंबर रोजी दक्षिण-पूर्व बंगळुरूमधील मुन्नेकोलालू येथील त्यांच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुभाषने व्हिडीओ आणि २४ पानांच्या सुसाईड नोटमध्ये असा पत्नीविरोधात आरोप केला. विभक्त पत्नी आणि सासरच्या लोकांनी त्यांना खोट्या प्रकरणात अडकवून आणि सतत त्रास करून आत्महत्या करण्यास भाग पाडले, असं या व्हिडीओत सांगितलं आहे.
निकिताला जामीन मिळाल्यानंतर, अतुल सुभाषचे वकील विनय सिंह म्हणाले, "जामीन मंजूर झाला आहे. आम्ही ऑर्डर शीटची वाट पाहत आहोत. आमचा युक्तिवाद तथ्यात्मक माहिती, छळ यावर होता. सध्या सुसाईड नोट पाठवली जात आहे. फॉरेन्सिक विश्लेषणसाठी पाठवले आहे, पण अद्याप विचारात घेतलेला नाही. त्यांचा आत्महत्येचा व्हिडीओ देखील फॉरेन्सिककडे पाठवण्यात आला आहे. त्यांचे हस्ताक्षर देखील तपासले जात आहे. आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत आहोत. आम्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहोत.
सरकारी वकील पोन्नन्ना यांनी जामिनाला विरोध केला आहे. याला आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वकील म्हणाले, "पत्नी, मेव्हणा आणि सासू हे सर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात आले होते आणि आता परवानगी देण्यात आली आहे. आम्हाला अजून सविस्तर आदेश पहायचा आहे. एकदा पाहू. चौकशी पूर्ण केल्याशिवाय त्यांना जामीन मंजूर करण्यात आला नसावा, हे सविस्तरपणे कळेल यावर खूश नाही आणि आव्हान देईन".