कोल्हापूरमधील प्रसिद्ध हत्तीण 'महादेवी' गुजरातच्या जामनगर येथील वनतारा संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता गुरुवारी होणार आहे.
सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि एएस चांदुकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी करण्यास सहमती दर्शविली. याचिकाकर्त्याने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करत म्हटले की, "वनतारा नावाचे एक अभयारण्य आहे, त्यांनी बळजबरीने मंदिरातील हत्तीण तिकडे नेली आहे."
नेमकं प्रकरण काय?
गेल्या ३० वर्षांपासून महादेवी ही कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थाच्या ताब्यात होती. तिला जामनगरला नेल्यानंतर हजारो लोकांनी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत.
जुलैमध्ये, जैन मंदिर ट्रस्टने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या याचिकेत माधुरी अर्थात महादेवी हत्तीणीला हस्तांतरित करण्याच्या आदेशाला आव्हान दिले होते. यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी म्हटले होते की, हत्तीणीचे कल्याण धार्मिक कार्यांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. हत्तीणीची शारीरिक स्थिती खराब असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
२८ जुलै रोजी, सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर मंदिर ट्रस्टने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आणि हत्तीणीला लवकरात लवकर वनताराला पाठवण्यास सांगितले होते. मात्र, हत्तीणीला जामनगरला पाठवल्यानंतर मोठा जनक्षोभ उसळला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, जैन मंदिर ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि राज्य सरकारही हत्तीणीला परत आणण्यासाठी समर्थन देईल.