महिलांसाठीच्या कॅन्सर व्हॅक्सीनसंदर्भात मोठी अपडेट, केव्हापासून होणार उपलब्ध? खुद्द केंद्रीय मंत्र्यानंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 20:29 IST2025-02-18T20:28:49+5:302025-02-18T20:29:18+5:30
ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी असेल? असे विचारले असता, जाधव म्हणाले, "ही लस स्तन, तोंड आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी मदत करेल."

प्रतिकात्मक फोटो
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कॅन्सरच्या लसीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, महिलांना होणाऱ्या कॅन्सरसाठी एक लस पुढील पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार आहे. ही लस ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाईल. देशात कॅन्सरचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. यातच कॅन्सरच्या लसीसंदर्भात ही मोठी अपडेट आली आहे.
30 वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांचे रुग्णालयांत स्क्रीनिंग होईल. तसेच, कॅन्सरचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी, डे केअर कॅन्सर सेंटर उभारले जातील. महत्वाचे म्हणजे, कॅन्सरच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील सीमा शुल्क देखील माफ करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली माहिती -
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. ही लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे. नऊ ते १६ वर्षे वयोगटातील मुली यासाठी पात्र असतील. केंद्रीय आयुष मंत्र्यांनी सांगितले की, लसीवरील संशोधन कार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे आणि त्याची चाचणी सुरू आहे. याच बरोबर, देशात कॅन्सर ग्रस्तांची संख्या वाढली आहे आणि केंद्र सरकारने या समस्येवर मातर करण्यासाठी विविध प्रकारची पावले उचलत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दिलासादायक बातमी -
ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी असेल? असे विचारले असता, जाधव म्हणाले, "ही लस स्तन, तोंड आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी मदत करेल." कॅन्सरसंदर्भातील ही व्हॅक्सीन एक दिलासादायक बातमी आहे. विशेषतः महिलांसाठी ही अत्यंत आवश्यक आहे. या लसीमुळे अनेकांचे जीव वाचतील.