Ajmer Sharif Dargah on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करुन भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर देशभरातून या कारवाईचे कौतुक केले जात आहे. विरोधकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आणि खेळाडूंपासून धर्मगुरुंपर्यंत सर्वच स्तरातातून सरकारचे आणि भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन करण्यात येत आहे. अजमेर शरीफ दर्ग्याचे आणि चिश्ती फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनीही भारतीय सैन्याचे अभिनंदन केले.
भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानात घुसून भारताने दहशतवाद्यांच तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. या कारवाईनंतर अजमेर शरीफ दर्ग्याचे हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी दहशतवादाला आश्रय देणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला जाईल असं म्हणत भारतीय सैन्याच्या कारवाईचे कौतुक केले.
या कारवाईन भारताकडून संपूर्ण जगाला एक स्पष्ट संदेश दिलाय की जो कोणी दहशतवादाला प्रोत्साहन देईल त्याला अशा प्रकारे नष्ट केले जाईल, असं हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले.
"सगळ्यात आधी मी आपल्या देशाच्या सशस्त्र दलांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून त्यांचा पूर्णपणे नायनाट केल्याबद्दल अभिनंदन करतो. २२ एप्रिल रोजी झालेल्या लज्जास्पद दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई आहे, ज्यामध्ये निष्पाप आणि निःशस्त्र भारतीयांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांचे प्राण गेले. आज, भारताने योग्य उत्तर दिले आहे. मी सर्वांचे अभिनंदन करतो. जो पण दहशतवादाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देईल त्यांना अशाच प्रकारे जमिनीत गाडले जाईल. आम्ही १४० कोटी देशवासीय संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की या जगात दहशतवादाला स्थान नाही, जो कोणी दहशतवादाला आश्रय देईल त्याला जमिनीत गाडले जाईल. कठोरपणे प्रत्युत्तर दिले जाईल," असे हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी म्हटले.