काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निवडणूक आयोगाला टीकेचं लक्ष्य करत आहेत. एकीकडे बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्येही मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप ते सातत्याने करत होते. दरम्यान, आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील मतदानामध्ये झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत.
पत्रकार परिषदेमधून महाराष्ट्रातील मतदानामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या पुराव्यांचं सादरीकरण करताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमध्ये चोरी झाली. महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक हरलो. महाराष्ट्रामध्ये सुमारे ४० लाख मतदार रहस्यमय आहेत. येथे पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक नवे मतदार नोंदवले गेले. या मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे. हे मतदार खरे आहेत की खोटे हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे.
राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार आकडेवारीची मागणी केली आहे. मात्र आम्हाला ती दिली गेली नाही. एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर देण्यास नकार दिला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, देशामध्ये बनावट मतदान होत आहे. आम्हाला ही चोरी पकडण्यात बराच काळ लागला. या मतदार यादीमध्ये अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीही लिहिण्यात आलेलं आहे. मतदारस यादीत अनेक घरांचा पत्ता शून्य आहे. डुप्लिकेट मतदारांची संख्या खूप अधिक आहे. ११ हजार संशयित असे आहेत, ज्यांनी तीन तीन वेळा मतदान केलं आहे. हे लोक कुठून येत आहेत. एकाच पत्त्यावर ४६ मतदार असल्याचं समोर आलं आहे.