पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. दोन्ही देशाचे लष्कर अलर्ट आहेत. तर दुसरीकडे, पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठी शोध मोहिम सुरू केली आहेत. दरम्यान, आता पूंछमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक मोठा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. सुरक्षा दलांनी ५ आयईडी जप्त केले आहेत. भारतीय लष्कराच्या जेकेपी एसओजी आणि रोमियो सीआयएफकडून ही कारवाई सुरू आहे.
पाकिस्तानकडून सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील ताणाव वाढला आहे. गेल्या ११ दिवसापासून पाकिस्तानच्या लष्कराकडून युद्धबंदीचे उल्लंघन सुरू आहे. आज ११ व्या दिवशीही पाकिस्तानकडून उल्लंघन झाले. या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील आठ आघाडीच्या क्षेत्रांमध्ये पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला, यामुळे शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आणि भारतीय सैन्याला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले गेले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशामधील तणाव वाढला असताना, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबाराची ही सलग ११ वी वेळ आहे. जम्मूमधील संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, ४ आणि ५ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर या भागात नियंत्रण रेषेवर छोट्या शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्याने तातडीने आणि प्रमाणबद्धपणे प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.