Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतानेपाकिस्तान विरोधात तातडीने ५ कठोर निर्णय घेतले. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे व्हिसा रद्द करणे. त्यात पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व १७ प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्येक देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट संपर्क करून एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, याची खातरजमा करण्यास सांगितले. परंतु, यानंतर आता लाँग टर्म व्हिसा याबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याला कारणही तसेच आहे. त्यामुळे लाँग टर्म व्हिसा म्हणजे नेमके काय? भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे त्याबाबत नेमके नियम काय आहेत? लाँग टर्म व्हिसाचे नेमके काय फायदे-तोटे सांगितले जातात? याबाबत जाणून घेऊया...
भारत सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडून जणांचा निर्णय घेतला. अशा वेळी अटारी-वाघा बॉर्डर आणि पंजाबच्या सीमेवर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी पाकिस्तानात परतण्यासाठी रांगा लावल्या आहेत. परंतु, या लाँग टर्म व्हिसामुळे भारत आणि पाकिस्तानातील नागरिकांना एकमेकांच्या देशात परतण्यास अडचणी येत आहेत. याचीच अनेक उदाहरणे समोर येत आहेत.
लाँग टर्म व्हिसा म्हणजे नेमके काय?
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांच्या नागरिकांना वैध कारणासाठी लाँग टर्म व्हिसा देतात. त्या व्हिसावर हे लोक पुढे नागरिकत्वासाठी अर्ज दाखल करू शकतात. परंतु, भारतात नागरिकत्व घेताना मुस्लिमांना वगळले जाते. पाकिस्तानही तसा व्हिसा देते. परंतु, भारतातून गेलेले हिंदू आणि ख्रिश्चन यांना या व्हिसाच्या आधारे पाकिस्तानात नागरिकत्व दिले जात नाही. त्यामुळे भारतातून पाकिस्तानात विवाह करून गेलेल्या अनेक महिला लाँग टर्म व्हिसा घेतात. परंतु, भारतीय नागरिकत्व सोडत नाहीत. हाच मुद्दा आता या महिलांसाठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. कारण, अशा आणीबाणीच्या परिस्थितीत भारतीय नागरिकत्व असेल, तर भारत सरकार आपल्या नागरिकांना पाकिस्तानात जाण्यास मनाई करते. तसेच भारतीय नागरिकत्व असलेल्यांना पाकिस्तान त्यांच्या देशात प्रवेश देत नाही. कारण सुरक्षिततेचा प्रश्न असतो. लाँग टर्म व्हिसाचे फायदे असतात तेव्हा ते आनंदाने घेतात. तोटे दिसायला लागले की अगदी रडकुंडीची वेळ येते, असे म्हटले जाते.
पाकिस्तान लाँग टर्म व्हिसा देते, पण नागरिकत्व नाही
भारतातील एखादी हिंदू महिला पाकिस्तानमध्ये विवाह होऊन गेली, तर तिला तिथे फक्त लाँग टर्म व्हिसा मिळतो. त्याच आधारे ती महिला पाकिस्तानात वास्तव्य करू शकते. मग कितीही वर्षे ती महिला पाकिस्तानात राहिली, तरी पाकिस्तान सरकार तेथील नागरिकत्व देत नाही. परंतु, त्या महिलेला जी अपत्ये होतात, त्यांना मात्र तत्काळ पाकिस्तानचे नागरिकत्व मिळते. परंतु, पाकिस्तानपेक्षा भारतीय नागरिकत्व ठेवण्यात पण फायदे आहेत. भारतीय व्हिसा अन्य देशांपेक्षा मजबूत असल्याने आणि भारतीय नागरिकत्वाची किंमत जगभरात तुलनेने अधिक असल्यामुळे त्या महिलाही भारतीय नागरिकत्व सोडत नाहीत. तसेच विवाह झाल्यानंतर प्रसुतीवेळी पाकिस्तानच्या तुलनेत भारतात वैद्यकीय सोयी, सुविधा अतिशय चांगल्या असल्यामुळे भारतीय नागरिकत्वाच्या आधारावर अशा महिला भारतात येऊन वैद्यकीय उपचार घेऊ शकतात. अशा प्रकारची काही उदाहरणे आता समोर येत आहेत.
मुले गेली पाकिस्तानात, पण आई राहिली भारतात
काही राजस्थानी-पाकिस्तानी महिलांनी अटारी-वाघा सीमा डोक्यावर घेतल्याचे सांगितले जात आहे. कारण पाकिस्तानचे नागरिकत्व असल्यामुळे त्यांच्या मुलांना पाकिस्तानात परत घेतले आहे. परंतु, आईकडे म्हणजेच त्या महिलांकडे पाकिस्तानाचे नागरिकत्व नसल्यामुळे त्यांना पाकिस्तानात प्रवेश दिला जात नाही. यातील अनेक महिलांच्या विवाहाला १० ते २० वर्षे झाली आहेत. त्यातून अपत्येही जन्मानला आली आहेत. परंतु, अद्यापही त्या महिलांना पाकिस्तानचे नागरिकत्व मिळालेले नाही. यामागे, उद्या काही कारणास्तव तलाक द्यायची वेळ आली, तर पोटगी किंवा त्या महिलेची जबाबदारी टाळता येऊ शकते. ती समाजाची जबाबदारीही राहत नाही आणि मेहेर परत करण्याची, हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कागदोपत्री त्या भारतीय नागरिक राहतात. याच कारणामुळे आता त्यांना पाकिस्तानात परत जाता येत नाही.
नागपुरातून समोर आला भलताच प्रकार
नागपूर येथे एक हिंदू पाकिस्तानी कुटूंब लाँग टर्म व्हिसावर आहे. घरातली महिला एका विवाह कार्यासाठी पाकिस्तानात गेली. तो विवाह ०६ मे रोजी आहे. परंतु, ही महिला २२ मार्चपासून तिथे गेली आहे. कारण ती पाकिस्तानी नागरिक आहे. हवी तेव्हा, हवी तितके दिवस राहू शकते. परंतु, आता भारत सरकारने लाँग टर्म व्हिसा होल्ड केले आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तानच्या सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळे ती महिला आता परत येऊ शकत नाही. दरम्यान, सीमेवरील असे प्रकार घडलेल्यांचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.