मोठी बातमी! मजुरांची १७ दिवसांची 'काळरात्र' संपली; एनडीआरएफची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 15:49 IST2023-11-28T15:42:38+5:302023-11-28T15:49:07+5:30
Uttarkashi Tunnel Rescue LIVE: बोगद्यामध्ये अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना देखील बोलविण्यात आले आहे. सर्वच्या सर्व ४१ मजूर ठीक असावेत अशी प्रार्थना केली जात आहे.

मोठी बातमी! मजुरांची १७ दिवसांची 'काळरात्र' संपली; एनडीआरएफची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली
उत्तरकाशीवरून महत्वाची बातमी येत आहे. ज्यांच्या सुटकेकडे गेली १७ दिवस भारतच नाही तर अवघे जग डोळे लावून बसले होते त्यांच्यापर्यंत एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करूनही गेल्या १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात अपयश येत होते. अखेर भारतीय सैन्याने त्यांची सुटका केली आहे.
बोगद्यात खोदाई संपली असून अडकलेल्य़ा ४१ मजुरांपर्यंत ८०० मीमी व्यासाचा पाईप टाकण्यात आले आहेत. या पाईपमधून एनडीआरएफची टीम मजुरांपर्यंत पोहोचली आहे. बोगद्यामध्ये अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना देखील बोलविण्यात आले आहे. सर्वच्या सर्व ४१ मजूर ठीक असावेत अशी प्रार्थना केली जात आहे. रेस्क्यू टीमने मजुरांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहेत.
या मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार आहे. यासाठी एम्सच्या डॉक्टरांना ऋषीकेशमध्ये हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. उत्तरकाशी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. यामुळे एम्स ऋषिकेश येथे, ट्रॉमा सेंटरमध्ये 20 बेड आणि काही आयसीयू बेड तयार ठेवण्यात आले आहेत, असे एम्स ऋषिकेशचे सहायक प्राध्यापक डॉ. नरिंदर कुमार यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारच्या आदेशानुसार उत्तरकाशीला पाठवण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.
मजुरांचे स्वागत करण्यासाठी तेथे उपस्थित कर्मचारी फुलांच्या हारांसह पोहोचले आहेत. कामगार बोगद्यातून बाहेर येताच त्यांना फुलांचा हार घालण्यात येणार आहे.