नोकरशाहीत मोठे खांदेपालट

By Admin | Updated: June 2, 2015 23:34 IST2015-06-02T23:34:45+5:302015-06-02T23:34:45+5:30

अनेक महिन्यांपासून नियुक्त्यांना उशीर होत असून फायलींचा ढीग वाढून निर्णय होत नसल्याच्या बातम्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या रिक्त जागा भरत

Big boss | नोकरशाहीत मोठे खांदेपालट

नोकरशाहीत मोठे खांदेपालट

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
अनेक महिन्यांपासून नियुक्त्यांना उशीर होत असून फायलींचा ढीग वाढून निर्णय होत नसल्याच्या बातम्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या रिक्त जागा भरत आणल्या आहेत. मोदी यांनी सोमवारी मुख्य दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी १८ मंत्रालयांमध्ये प्रशासकीय पातळीवर खांदेपालट केले.
त्यात नागरी उड्डयन, अन्न आणि ग्राहक व्यवहार, खाणी, सार्वजनिक उद्योग, जलस्रोत आणि गंगा शुद्धीकरण, खते, विदेश व्यवहार आणि अन्य खात्यांचा समावेश आहे. तथापि, सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखालील मनुष्यबळ मंत्रालयातील दोन वरिष्ठ सचिवांना हलवणे. वृंदा स्वरूप व सत्यनारायण मोहंती हे शालेय शिक्षण विभागात सचिव होते. त्यांना तेथून हलविण्यात आले आहे. या दोघांचा गेल्या अनेक महिन्यांपासून स्मृती इराणींशी संघर्ष सुरू होता व त्या दोघांनीही या मंत्रालयातून बदली मागितली होती.
वृंदा स्वरूप या वरिष्ठ आयएएस अधिकारी असून त्यांना बक्षीस म्हणून अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव करण्यात आले आहे. सत्यनारायण मोहंती यांना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुभाषचंद्र खुंतिया आणि विनयशील ओबेरॉय यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयात हलविण्यात आले आहे. ओबेरॉय हे १९७९ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून त्यांचेही महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्याशी जमत नव्हते. ओबेरॉय यांनीही बदली मागितली होती. अनुज कुमार बिश्नाई हे जलस्रोत व गंगा शुद्धीकरण मंत्री उमा भारती यांच्या हाताखाली काम करीत होते. त्यांना खते विभागाचे सचिव करण्यात आले आहे. त्यांच्या जागी मोदी यांनी शशी शेखर यांची नियुक्ती केली आहे. मोदी यांच्यासाठी महत्त्व असलेल्या गंगा शुद्धीकरण प्रकल्पाच्या देखरेखीसाठी गेल्या १० महिन्यांत नियुक्त झालेले शशी शेखर हे तिसरे सचिव आहेत.
थोडक्यात सांगायचे तर मोदी यांनी विविध मंत्रालये आणि विभागात गेल्या आठवड्यात जवळपास ५ डझन जागा भरल्या.

Web Title: Big boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.