इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:20 IST2025-07-18T17:20:09+5:302025-07-18T17:20:50+5:30
India Alliance News: आज इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असून, आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीसोबतचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. आम आदमी पक्षाने उचलेल्या या पावलामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अबकी बार ४०० पारची गर्जना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि एनडीएने निर्विवाद बहुमत मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या इंडिया आघाडीने भाजपाला २४० जागांवर तर एनडीएला ३०० जागांच्या आत रोखले होते. मात्र आता विरोधी पक्षांच्या या इंडिया आघाडीतील ऐक्य खिळखिळं होताना दिसत आहे. त्यातच आज या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असून, आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीसोबतचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. आम आदमी पक्षाने उचलेल्या या पावलामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीसह अनेक निवडणुका आपने स्वबळावर लढल्या होत्या. दरम्यान, आज आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीपासून फारकत घेण्याची औपचारिक घोषणा केली आहे. याबाबत आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, आमचा पक्ष इंडिया आघाडीने बोलावलेल्या बैठकीमध्ये सहभागी होणार नाही. आमचा पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी आप इंडिया आघाडीमधून बाहेर पडली असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही आम आदमी पक्ष संसदीय प्रश्नांवर तृणमूल काँग्रेस, डीएमके यांसारख्या विरोधी पक्षांसोबत समन्वय राखून त्यांना पाठिंबा देईल.
संजय सिंह पुढे म्हणाले की, इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन झाली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाने हरयाणा आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसोबत पंजाब आणि गुजरातमधील पोटनिवडणुका स्वबळावर लढल्या होत्या. अशाप्रकारे इंडिया आघाडीमधून आम आदमी पक्ष राजकीयदृष्ट्या आधीच वेगळा झाला होता. संजय सिंह यांनी केलेल्या या घोषणेनंतर आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला आम आदमी पक्ष उपस्थित राहणार नाही.