Big announcement: 7 Lakhs Posts Vacant In Central Government, 1 Lakh Post Recruitment Process Says Jitendra Singh | मोठी घोषणाः मोदी सरकारची 'मेगाभरती', वर्षभरात १ लाखाहून अधिक रिक्त पदं भरणार!

मोठी घोषणाः मोदी सरकारची 'मेगाभरती', वर्षभरात १ लाखाहून अधिक रिक्त पदं भरणार!

नवी दिल्ली : देशात सर्वत्र बेरोजगारीची चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून लवकरच 'मेगाभरती' सुरू करण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 1 लाखाहून अधिक रिक्त पदांवर भरती होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 1 मार्च 2018 पर्यंत जवळपास 7 लाख जागा रिक्त असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितले. 

गुरुवारी जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या जागांसदर्भात माहिती दिली. यावेळी तृतीय श्रेणीत 5,74,289 पदे रिक्त आहेत. द्वितीय श्रेणीत 89,638 पदे आणि प्रथम श्रेणीत 19,896  पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची एकूण संख्या 6,88,823 इतकी आहे, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच, 2019-20 मध्ये कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ) 1,05,338 केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याच्या तयारीत असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले. 

2017-18 च्या दरम्यान रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ((RRB)) कडून सेंट्रलाइज्ड एम्पलॉयमेंट नोटिफिकेशन (CENs) द्वारे 1,27,573 जागांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. याशिवाय 2018-19 मध्ये तृतीय श्रेणी आणि लेव्हल-1 पोस्टसाठी पाच CENs जारी करण्यात आले होते. त्याद्वारे 1,56,138 जागा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकूण 4,08,591 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. 

याचबरोबर, लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 जानेवारी 2016 पासून अनेक जागांसाठी मुलाखती बंद केल्या आहेत. जास्तकरून टेस्ट ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. तसेच, एससी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षित बॅकलॉग जागांची मोठी संख्या आहे, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Big announcement: 7 Lakhs Posts Vacant In Central Government, 1 Lakh Post Recruitment Process Says Jitendra Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.