Bhojshala Dispute: ज्ञानवापी मशिदनंतर आता 'भोजशाळेचा' वाद, जाणून घ्या काय आहे प्रकरण..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 14:53 IST2022-05-15T14:53:29+5:302022-05-15T14:53:41+5:30
Bhojshala Dispute: भोजशाळेच्या आवारात मंगळवारी हिंदू पूजा करतात, तर शुक्रवारी मुस्लिम नमाज अदा करतात.

Bhojshala Dispute: ज्ञानवापी मशिदनंतर आता 'भोजशाळेचा' वाद, जाणून घ्या काय आहे प्रकरण..?
Bhojshala Dispute: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत दावा केला जातोय की, ही मशीद प्राचीन विश्वेश्वर मंदिराच्या वर बांधण्यात आली होती. यासाठी आता मशिदीच्या परिसरात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेक्षणाचा अहवाल 17 मे रोजी न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. त्यानंतर आता धार जिल्ह्यातील भोजशाळेचेही प्रकरणही चर्चेत येत आहे.
धार हे भोपाळपासून अडीचशे किलोमीटर अंतरावर इंदूरजवळ वसलेले ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा संबंध राजा भोजशी असल्याचे सांगितले जाते. शहराच्या एका बाजूला भोजशाळा बांधलेली आहे, जी दहाव्या शतकात राजा भोजने बांधली असे म्हणतात. असे मानले जाते की ही एक संस्कृत शाळा होती, ज्यामध्ये देवी सरस्वती किंवा वाग्देवीची मूर्ती देखील स्थापित केली गेली होती.
पण, या मूर्त्या ब्रिटिश त्यांच्याबरोबर लंडनला घेऊन गेले. या संकुलाला लागून तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील सुफी कमाल मौलाचा दर्गा आहे. तेराव्या शतकापासूनच्या कागदपत्रांमध्ये, भोजशाळेचे वर्णन कमल मौलाची मशीद असे करण्यात आले आहे, म्हणून येथे आवारात नमाज अदा केली जाते.
मंगळवारी पूजा आणि शुक्रवारी नमाज
अनेक वर्षांच्या वादानंतर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने संकुलाचा ताबा घेतला आहे आणि हिंदूंना मंगळवारी पूजा करण्याची आणि मुस्लिमांना शुक्रवारी दुपारची नमाज अदा करण्याची परवानगी दिली आहे. उरलेल्या दिवसांसाठी ती पुरातत्व विभागाची इमारत आहे. धारमध्ये कार्यरत हिंदू संघटनांकडून भोजशाळा ताब्यात घेण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. 2003 पासून सुरू असलेल्या भाजपच्या राजवटीत त्यांची सुनावणी होईल, अशी आशा होती, मात्र 2013 पासून केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतरही त्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
न्यायालयात याचिका दाखल
हिंदू फ्रंट फॉर जस्टिसच्या वतीने उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. भोजशाळेची जागा हिंदूंना देण्यासाठी आणि मुस्लिमांना नमाज अदा करण्यापासून रोखण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. हिंदू बाजूची याचिका वकील हरिशंकर जैन यांनी दाखल केली असून त्यांनी ज्ञानवापी मशीद आणि कुतुबमिनारचा वादही उपस्थित केला आहे. ही याचिका स्वीकारत न्यायालयाने संबंधित पक्षकारांना नोटीस देऊन त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.