भारतरत्नचे यंदा पाच मानकरी?
By Admin | Updated: August 10, 2014 13:11 IST2014-08-10T03:20:25+5:302014-08-10T13:11:29+5:30
केंद्र सरकारने रिझव्र्ह बँकेच्या टाकसाळीत भारतरत्न पुरस्काराची पाच स्मृतिचिन्हे बनविण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे.

भारतरत्नचे यंदा पाच मानकरी?
>नवी दिल्ली : केंद्र सरकारने रिझव्र्ह बँकेच्या टाकसाळीत भारतरत्न पुरस्काराची पाच स्मृतिचिन्हे बनविण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार यंदा एकाचवेळी पाच जणांना दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार गृह मंत्रलयाने या आठवडय़ाच्या प्रारंभीच रिझव्र्ह बँकेच्या टाकसाळीत भारतरत्न पुरस्काराची पाच स्मृतिचिन्हे निर्मितीची सूचना केली असून स्वातंत्र्य दिनानंतर या पुरस्कारांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अर्थात एकाच वेळी पाच स्मृतिचिन्हे बनविण्यास सांगितली याचा अर्थ एकापेक्षा अधिक लोकांना हा सन्मान प्रदान केला जाईल असेही नाही. सरकारतर्फे ही स्मृतिचिन्हे राखीवही ठेवली जाऊ शकतात.
काँग्रेसच्या राजवटीत नेहरू-गांधी परिवारावरच लक्ष केंद्रीत राहिल्याने अनेक मान्यवरांना हा बहुमान प्राप्त होऊ शकला नाही, अशी भावना संघ परिवारात आहे. ही भावना लक्षात घेऊन यंदा निवड केली जाईल.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ वैज्ञानिक सीएनआर राव यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी सचिनच्या आधी हॉकीपटू ध्यानचंद यांना हा सन्मान प्रदान केला जावा, अशी मागणी होती. पण सचिनला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता ध्यानचंद यांना पुरस्कार केव्हा मिळणार याची प्रतीक्षा आहे. बसपाचे संस्थापक कांशीराम यांना भारतरत्न देण्याचीही मागणी आहे. दलित समाजाला जवळ करण्यासाठी कांशीराम यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह आझाद हिंद सेनेचे सेनापती सुभाषचंद्र बोस, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदनमोहन मालवीय, प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा आणि गीता प्रेसचे संस्थापक हनुमान प्रसाद पोद्दार यांना हा सन्मान दिला जाणार असल्याचे कळते.