भारतरत्न: ते शिल्पकार होते लालकृष्ण अडवाणी; रथयात्रेमुळे राजकारणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 06:14 AM2024-02-04T06:14:25+5:302024-02-04T06:15:57+5:30

या यात्रेमुळे देशाच्या राजकारणात भाजपचा पाया मजबूत झाला आणि त्याचे शिल्पकार हाेते लालकृष्ण अडवाणी.

Bharat Ratna: Rath Yatra turns politics upside down; That architect was LK Advani | भारतरत्न: ते शिल्पकार होते लालकृष्ण अडवाणी; रथयात्रेमुळे राजकारणाला कलाटणी

भारतरत्न: ते शिल्पकार होते लालकृष्ण अडवाणी; रथयात्रेमुळे राजकारणाला कलाटणी

अयाेध्येमध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामलल्ला विराजमान झाले. श्रीराम मंदिरासाठी सुरू झालेल्या आंदाेलनाने देशाच्या राजकारणाला कलाटणी दिली. त्यातही सर्वात महत्त्वाची ठरली ती रथयात्रा. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात ही रथयात्रा काढण्यात आली. या यात्रेमुळे देशाच्या राजकारणात भाजपचा पाया मजबूत झाला आणि त्याचे शिल्पकार हाेते लालकृष्ण अडवाणी.

१९८९च्या लाेकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. अशा वेळी भाजपने जनता दलाला श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरून बाहेरून पाठिंबा दिला. सरकार स्थापन झाल्यानंतरही श्रीराम मंदिराबाबत काेणताही ताेडगा काढण्याच्या हालचाली दिसत नव्हत्या. त्यावेळी भाजप नेत्यांनी अयाेध्येतील वादग्रस्त जागेवर कारसेवा करण्याचे जाहीर केले. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी भाजपचे अध्यक्ष हाेते. सरकारने ताेडगा न काढल्यास कारसेवा अटळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर देशभरात कारसेवेची तयारी सुरू झाली. समित्या स्थापन झाल्या. सप्टेंबर १९९०मध्ये अडवाणी हे पत्नी कमला यांच्यासाेबत चर्चा करीत असताना पक्षाचे सरचिटणीस प्रमाेद महाजन तेथे पाेहाेचले. त्यावेळी अडवाणी यांनी सर्वप्रथम यात्रा काढण्याचा विचार मांडला. साेमनाथ ते अयाेध्या पदयात्रा काढण्याचा मी विचार करीत असल्याचे ते म्हणाले. पदयात्रेऐवजी रथयात्रा काढण्याची कल्पना महाजन यांना सुचली.  मिनी बस किंवा मिनी ट्रकला रथाचे स्वरूप देऊन तुम्ही त्यातून जावे, असे महाजन अडवाणी यांना म्हणाले. 

अडवाणी यांनी याबाबत काहीसा विचार केला. अखेर त्यांनी रथयात्रेला हाेकार दिला. प्रमाेद महाजन यांनी रथयात्रेचे नियाेजन आणि व्यवस्थेची जबाबदारी घेतली. २५ सप्टेंबर १९९० राेजी साेमनाथ येथून रथयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर इतिहास घडला. 

लालू प्रसाद यादव यांनी राेखली हाेती रथयात्रा
देशभरात लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या रथयात्रेला जाेरदार प्रतिसाद मिळत हाेता. एक वेळ अशी हाेती, ज्यावेळी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी राज्यात कारसेवकांवर गाेळीबार करण्याचे आदेश दिले हाेते. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याचदरम्यान, बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रथयात्रा समस्तीपूरमध्ये राेखली आणि अडवाणी यांना अटक केली. 

वाजपेयींशी घट्ट मैत्री

एकेकाळी लाेकसभेत भाजपचे केवळ २ खासदार हाेते. हा आकडा १९९९ मध्ये १८२वर पाेहाेचला. २ ते १८२ या प्रवासात भाजपच्या दाेन दिग्गज नेत्यांची प्रमुख भूमिका राहिली. ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी. या दाेघांची अतिशय घट्ट मैत्री हाेती. 
वाजपेयी हे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासाेबत देशव्यापी दाैऱ्यावर हाेते. त्यावेळी काश्मीरला जाताना काेटा रेल्वे स्थानकावर त्यांची भेट झाली. अडवाणी हे त्यावेळी राजस्थानात संघाचे प्रचारक हाेते. वाजपेयी यांच्यासाेबत त्यांनी काही दिवस राजस्थानचा दाैरा केला हाेता. त्यांच्या वक्तृत्व काैशल्याने अडवाणी भारावून गेले हाेते. दाेन्ही नेत्यांची शैली तसेच बलस्थाने वेगळी हाेती. परंतु, दाेघांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास हाेता. 

मित्रासाठी साेडले पद 
१९९५मध्ये नाेव्हेंबर महिन्यात भाजपचे मुंबईत अधिवेशन सुरू हाेते. त्यावेळी लाेकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव जाहीर हाेईल, अशी चर्चा हाेती. मात्र, अडवाणींनी भाषण सुरू केले आणि म्हणाले, ‘अबकी बारी अटल बिहारी.’ या वाक्याने स्वत: वाजपेयी चकीत झाले. 

Web Title: Bharat Ratna: Rath Yatra turns politics upside down; That architect was LK Advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.