Bharat Jodo yatra: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?, राहुल गांधी यांनी अखेर सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 14:16 IST2022-09-09T14:15:51+5:302022-09-09T14:16:48+5:30
काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा तब्बल ३५७० किमी इतका प्रवास करणार आहे.

Bharat Jodo yatra: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?, राहुल गांधी यांनी अखेर सांगितलं...
नवी दिल्ली-
काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा तब्बल ३५७० किमी इतका प्रवास करणार आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. भाजपा आणि स्वयंसेवक संघाची विचारधारा ही द्वेष पसरवण्याची आहे. आमची यात्रा भाजपाच्या याच विचारधारेच्या विरोधात आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
प्रत्येकाचं एक मत असतं. भाजपाचीही एक भूमिका आहे. संघाचीही आहे. त्यांच्या विचारांचं स्वागतच आहे. आमच्यासाठी ही यात्रा लोकांना जोडण्याची यात्रा आहे. भाजपाच्या विचारधारेनं देशाचं जे नुकसान झालं आहे ते भरुन काढण्यासाठी आम्ही या यात्रेची सुरुवात केली आहे. भाजपा आणि संघाची विचारधारा द्वेष पसरवणारी विचारधारा आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर काय बोलले?
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विचारण्यात आलं असता राहुल गांधी यांनी सूचक विधान केलं. "मी निवडणूक लढवणार की नाही हे लवकरच निवडणूक होणार आहे त्यामुळे ते कळेलच", असं ते म्हणाले. यावर तुम्ही थेट नकार दिलेला नाही असं विचारलं. त्यावर ते म्हणाले की, मी माझा निर्णय घेतलेला आहे आणि मी त्यावर ठाम आहे.
भाजपानं देशातील संस्थांवर केला कब्जा
काँग्रेसचा मी सदस्य असल्याच्या नात्यानं मी या यात्रेत सहभागी आहे. ही यात्रा भारत जोडो यात्रा आहे. याचा फायदा जर काँग्रेसला होत असेल तर चांगलंच आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. "भाजपानं देशातील सर्व संस्थांवर कब्जा केला आहे. संस्थांवर दबाव टाकून कशापद्धतीनं काम केलं जात आहे ते सर्वांनाच माहित आहे. आम्ही कोणत्याही एका राजकीय पक्षासोबत नव्हे, तर आम्ही सर्व संस्थांविरोधात देखील लढा देत आहोत. मीडिया आज विरोधकांचा साथीदार राहिलेला नाही", असं राहुल गांधी म्हणाले.