'कोव्हिशील्ड'पेक्षा 'कोव्हॅक्सीन'चा प्रभाव कमी? प्रभावाची चाचणी करण्याची भारत बायोटेकची मोठी घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 20:00 IST2021-06-09T20:00:09+5:302021-06-09T20:00:54+5:30
भारतात सध्या कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन कोरोना विरोधी लसींचा वापर केला जात आहे. पण कोव्हॅक्सीनचा प्रभाव कोव्हिशील्डपेक्षा कमी असल्याचा दावा फेटाळून लावताना भारत बायोटेक कंपनीनं आता मोठी घोषणा केली आहे.

'कोव्हिशील्ड'पेक्षा 'कोव्हॅक्सीन'चा प्रभाव कमी? प्रभावाची चाचणी करण्याची भारत बायोटेकची मोठी घोषणा!
भारतात सध्या कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन कोरोना विरोधी लसींचा वापर केला जात आहे. पण कोव्हॅक्सीनचा प्रभाव कोव्हिशील्डपेक्षा कमी असल्याचा दावा फेटाळून लावताना भारत बायोटेक कंपनीनं आता मोठी घोषणा केली आहे. कोव्हॅक्सीनच्या चौथ्या टप्प्यातील चाचणीला भारत बायोटेक सुरुवात करणार आहे. या टप्प्यात कोव्हॅक्सीनचा डोस घेतलेल्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. यातून कोव्हॅक्सीनचा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये झालेल्या लसीच्या परिणामकारकतेचा अभ्यास केला जाणार आहे. (Bharat Biotech Announces Fourth Phase Trials Of Covaxin To Check Real World Efficacy After New Study Row)
नुकतंच प्रकाशीत झालेल्या एका अहवालात कोव्हॅक्सीनच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यासोबतच कोव्हिशील्डच्या तुलनेत कोव्हॅक्सीन कमी प्रभावी असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, भारत बायोटेकनं हा दावा पूर्णपणे अवैज्ञानिक आणि पूर्वग्रह ठेवून केला गेल्याचा म्हटलं आहे. कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या चाचणीचा अहवाल जुलै महिन्यात प्रसिद्ध करणार असल्याचंही भारत बायोटेकनं यावेळी स्पष्ट केलं आहे.
चौथ्या टप्प्याच्या चाचणीची गरज का भासली?
कोलकाता स्थित एका अँडोक्रायनॉजिस्ट डॉक्टर अवधेश कुमार सिंह यांनी कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या इम्यून रिस्पॉन्सची तुलना करणारा अभ्यास केला होता. त्यांच्या माहितीनुसार, कोव्हॅक्सीनच्या तुलनेत कोव्हिशील्डमुळे शरीरात अधिक अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजेच कोव्हिशील्डच्या तुलनेत कोव्हॅक्सीनचा प्रभाव खूप कमी आहे. यामुद्द्यावरुन डॉ. अवधेश कुमार सिंह आणि भारत बायोटेकचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड रेच्स एल्ला यांच्यात ट्विटरवॉर रंगल्याचंही पाहायला मिळालं. दोघांमध्ये रंगलेल्या वादात नेटिझन्सनंही उडी घेत भारत बायोटेकनं तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली.
चौथ्या टप्प्यातील चाचणीनं प्रभावाची माहिती मिळेल
कोव्हॅक्सीनच्या चौथ्या टप्प्यातील चाचणीतून केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये लसीच्या परिणामकारकतेचीच नव्हे, तर जागतिक स्तरावर वैज्ञानिक सुरक्षा मानकांच्या पातळीवर लस कितपत प्रभावी ठरतेय हेही समोर येईल, असं भारत बायोटेकनं म्हटलं आहे. जानेवारीपासूनचं कोव्हॅक्सीनचे डोस देण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत लाखो डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच आमच्याकडे एक विश्वसनीय आणि विस्तृत माहिती उपलब्ध होईल, असंही कंपनीनं म्हटलं आहे.
अंतरिम अहवालात कोव्हॅक्सीन ७८ टक्के प्रभावी
भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) जाहीर केलेल्या अंतरिम अहवालानुसार कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत मिळून लस एकूण ७८ टक्के प्रभावी असल्याचं निष्पन्न झालं आहे. यासोबत लस घेतल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ अद्याप कुणावरही आलेली नाही.