भेंडाळा-भिवधानोरा डांबरी रस्ता खचला
By admin | Updated: June 22, 2015 01:54 IST
वाहतूक प्रभावित : चार गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
भेंडाळा-भिवधानोरा डांबरी रस्ता खचला
वाहतूक प्रभावित : चार गावांचा संपर्क तुटण्याची शक्यताकायगाव : अगरवाडगाव परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने मुख्य डांबरी रस्ता खचला असून त्यामुळे चार गावांची वाहतूक प्रभावित झाली आहे. पाच फुटाच्या डांबरी आणि तीन फुटी साईड पट्टीवरून मार्ग काढत वाहनधारकांना वाहन चालवावे लागत आहे.अगरवाडगाव, गळनिंब, भिवधानोरा आणि धनगरपट्टी या चार गावांशी संपर्क असणारा भेंडाळा-भिवधानोरा हा एकमेव रस्ता आहे. एकाच रात्री झालेल्या १२० मि.मी. पावसाने परिसरात पाणीच पाणी करून टाकले. त्या रात्री आठ तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावरील फरशीचे पूल सुमारे आठ ते दहा फूट वाहून गेले होते आणि डांबरी रस्ताही खचला होता. रस्त्याची परिस्थिती आता खूपच बिकट झाली आहे. डांबरी रस्ता फक्त पाच-सहा फूट शिल्लक राहिला असून साईडपट्टी तीन फुटांची आहे. आणखी थोड्या फार पावसाने आणि पाण्याने उरलासुरला रस्ताही खचण्याची शक्यता आहे. या आठ-नऊ फुटी रस्त्यावर चार गावांची वाहतूक आणि संपर्क अवलंबून आहे. प्रशासनाच्या वतीने फक्त दगड ठेवून त्याला पांढरा रंग मारण्यात आला असून रात्रीच्या वेळी या खचलेल्या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.