अजबच! 4 महिन्यांपूर्वी लग्नातून अचानक बेपत्ता झाला, आता भीक मागून मोमोज खाताना सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 16:18 IST2023-06-14T16:12:20+5:302023-06-14T16:18:47+5:30
भागलपूरमधील एक जण चार महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो आता नोएडामध्ये सापडला आहे

फोटो - news18 hindi
बिहारमधील भागलपूरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. भागलपूरमधील एक जण चार महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो आता नोएडामध्ये सापडला आहे. तरुणाच्या वडिलांनी अपहरणाचा आरोप करत सासरच्या मंडळींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून खून झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र बेपत्ता व्यक्ती नोएडामध्ये भीक मागून मोमोज खाताना दिसला आहे.
सासरच्यांनी तरुणाला नोएडाहून भागलपूरला आणलं आणि सुलतानगंज पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी तरुणाला न्यायालयात हजर केलं. व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नाही. हे संपूर्ण प्रकरण हुंड्याशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे. भागलपूर खारीक येथील सचिदानंद कुंवर यांचा मुलगा निशांत हा विवाह समारंभासाठी सुल्तानगंजच्या गनगनिया येथे गेला होता. तेथून 31 जानेवारीपासून तो बेपत्ता झाला होता.
सासरचे लोक त्याचा सर्वत्र शोध घेत होते. निशांतच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर अपहरणाचा आरोप करत एसएसपीकडे अर्ज सादर केला होता. पोलीसही व्यक्तीचा शोध घेत होते. 12 जून रोजी निशांतचा मेहुणा रविशंकर यांनी नोएडामध्ये एक व्यक्तीला भीक मागताना आणि मोमोज खाताना पाहिलं. रविशंकर यांनी मोमोज विक्रेत्याला त्याचे पैसे दिले. निशांतकडे चौकशी केली. तेव्हा रविशंकर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही व्यक्ती निशांत असल्याचं समोर आलं.
रविशंकर यांनी नोएडा पोलिसांना माहिती दिली आणि कागदोपत्री काम करून निशांतला भागलपूरला आणले. रविशंकर यांनी सांगितले की, निशांत लग्न समारंभासाठी आला होता आणि तो बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी माझ्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर चुकीचा आरोप केला होता. त्यासोबतच आमच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे निशांतने सांगितले की, तो स्वत: नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी नोएडाला गेला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.