'खबरदार, माझ्या घरी स्मार्ट मीटर बसवला तर...'; वीज कर्मचाऱ्यांकडूनच होतोय विरोध, देतायत धमक्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 09:43 IST2025-12-11T09:43:26+5:302025-12-11T09:43:45+5:30
Gorakhpur Smart Meter Oppose: वीज विभागाने अलीकडेच एक आदेश जारी केला आहे, ज्यानुसार सर्व कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी स्मार्ट मीटर बसवणे अनिवार्य आहे.

'खबरदार, माझ्या घरी स्मार्ट मीटर बसवला तर...'; वीज कर्मचाऱ्यांकडूनच होतोय विरोध, देतायत धमक्या...
उत्तर प्रदेशातील गोरखपुर शहरात 'स्मार्ट मीटर' बसवण्याच्या मोहिमेला आता हिंसक विरोध होत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वीज विभागाचे कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी राहत असलेल्या वसाहतीत मीटर बसवण्यासाठी गेलेल्या कनिष्ठ मीटर परीक्षकांना शिवीगाळ, गैरवर्तन आणि 'स्मार्ट मीटर लावला तर तुझा पाय चिरून टाकीन' अशा उघड धमक्या देण्यात आल्या आहेत.
वीज विभागाने अलीकडेच एक आदेश जारी केला आहे, ज्यानुसार सर्व कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी स्मार्ट मीटर बसवणे अनिवार्य आहे. त्यानुसार, बुधवारी वीज विभागाचे कनिष्ठ मीटर परीक्षक सूरजकुंड परिसरातील माधोपूर आणि शाहपूरच्या शिवपूर सहबाजगंज भागात मीटर बसवण्यासाठी गेले होते. या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आणि एका वीज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी मीटर बसवण्यावरून मोठा वाद झाला. मीटर लावण्यास विरोध करणाऱ्यांनी जेएमटी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले, त्यांना शिवीगाळ केली आणि 'स्मार्ट मीटर लावला तर त्याला कापून टाकू' अशा धमक्या दिल्या.
एका जेएमटीने आपल्या वरिष्ठांना दिलेल्या माहितीनुसार, एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाने "माझ्या घरी अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता आहेत, मी तुला निलंबित करायला लावेन," अशा धमक्या देत अपशब्द वापरले.
तक्रार दाखल करण्याची तयारी
या संपूर्ण घटनेनंतर दोन्ही जेएमटी कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे तातडीने तक्रार केली आहे. धमक्या देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विवादाचे मूळ कारण
गोरखपूरमध्ये स्मार्ट मीटरवरून ग्राहकांमध्ये आधीच मोठा असंतोष आहे. अनेक ग्राहकांचा असा दावा आहे की, स्मार्ट मीटरमुळे बिले दुप्पट ते तिप्पट येत आहेत, तर काही ठिकाणी अचानक कनेक्शन कट होण्याच्या समस्या आहेत. आता कर्मचाऱ्यांच्या घरातही हे मीटर लावण्यास विरोध होत असल्याने, या योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.