Bengaluru Metro Yellow: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्नाटकच्या दौऱ्यावर आले असताना, एकाच वेळी ३ वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच, पंतप्रधानांनी बंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचेही उद्घाटन केले. आरव्ही रोड (रागीगुड्डा) ते बोम्मासंद्रा पर्यंत असा त्या मेट्रोचा मार्ग असणार आहे. मेट्रो यलोच्या उद्घाटन प्रसंगानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू मेट्रो फेज-२ प्रकल्पांतर्गत आरव्ही रोड (रागीगुड्डा) ते बोम्मासंद्रा पर्यंतच्या यलो लाईनचे उद्घाटन केले. ही लाईन १९ किमी पेक्षा जास्त लांबीची आहे आणि त्यात १६ स्थानके आहेत, यासाठी सुमारे ७,१६० कोटी रुपये खर्च आहे.
मेट्रो फेज-३ प्रकल्पाची पायाभरणी
आरव्ही रोड (रागीगुड्डा) ते इलेक्ट्रॉनिक सिटी मेट्रो स्टेशनपर्यंत येलो लाईनवर पंतप्रधानांनी मेट्रोचा प्रवास केला. बेंगळुरूची नम्मा मेट्रो ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब मेट्रो नेटवर्क आहे. यातून दररोज ८ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. बेंगळुरूमध्ये शहरी कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एका जाहीर सभेलाही संबोधित केले. या यलो लाईनच्या उद्घाटनासह, बेंगळुरूमधील मेट्रोचे कार्यरत जाळे ९६ किमीपेक्षा जास्त वाढेल आणि या प्रदेशातील मोठ्या लोकसंख्येला त्याचा फायदा होईल. या लाईनवर १६ स्थानके आहेत. पंतप्रधान मोदींनी १५,६१० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या बेंगळुरू मेट्रो फेज-३ प्रकल्पाची पायाभरणीही केली. या प्रकल्पाची एकूण लांबी ४४ किमीपेक्षा जास्त असेल आणि त्यात ३१ उन्नत स्थानके असतील.
३ वंदे भारत मेट्रो गाड्यांना हिरवा झेंडा
पंतप्रधान मोदींनी बेंगळुरू ते बेळगाव, अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर (अजनी) ते पुणे या वंदे भारत या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मुलांशी भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. या हाय-स्पीड गाड्या प्रवाशांना जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देतील आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करतील.