ममता बॅनर्जी यांच्यासह ३ नेत्यांना राज्यपालांनी ४४ कोटींची पाठवली नोटीस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:59 IST2025-02-12T15:58:09+5:302025-02-12T15:59:58+5:30
राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.

ममता बॅनर्जी यांच्यासह ३ नेत्यांना राज्यपालांनी ४४ कोटींची पाठवली नोटीस!
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि राज्यपाल यांच्यातील वादविवाद वाढला आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. दरम्यान, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.
राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांची मानहानी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार सयंतिका बॅनर्जी आणि रैयत हुसैन सरकार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच, जर या संदर्भात तात्काळ माफी मागितली नाही तर त्यांच्यावर प्रत्येकी ११ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी मे २०२४ मध्ये पश्चिम बंगालच्या २ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी, बारानगर मतदारसंघातून सयंतिका बॅनर्जी आणि भगवान गोला मतदारसंघातून रैयत हुसैन सरकार विजयी झाले. या दोन्ही आमदारांच्या शपथेबाबत वाद निर्माण झाला होता. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना शपथ देण्याचा अधिकार दिला नाही. तर राज्यपालांनी उपसभापतींनी दोघांनाही शपथ द्यावी, असे सांगितले.
मात्र, दोन्ही आमदारांनी राजभवनात जाऊन शपथ घेण्यास नकार दिला. या आमदारांनी सांगितले होते की, राजभवन सुरक्षित नाही. या संपूर्ण घटनेवरून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजभवनाबद्दल गंभीर टिप्पणी केली होती. ममता बॅनर्जी म्हणाल् होत्या की, राजभवनात महिला सुरक्षित नाहीत. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, दोन्ही आमदारांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.