काश्मीरमधील पारा गोठणबिंदूच्या खाली; थंडी वाढणार, उत्तरेकडे तापमानात माेठी घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 05:38 IST2024-12-08T05:38:10+5:302024-12-08T05:38:26+5:30
दक्षिण काश्मीरचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या काझीगुंड शहरातील तापमान उणे २.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

काश्मीरमधील पारा गोठणबिंदूच्या खाली; थंडी वाढणार, उत्तरेकडे तापमानात माेठी घट
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये थंडी वाढल्याने या केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील पारा गोठणबिंदूच्या खाली घसरला आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे दोन नोंदवण्यात आले. राजस्थानातही थंडीने जोर पकडल्याने किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. राजधानी दिल्लीत या हंगामातील सर्वाधिक थंडी शनिवारी अनुभवायला मिळाली. दिल्लीत किमान तापमान ७.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर उत्तरेकडील वारे देशभरात गारठा आणणार आहेत.
दक्षिण काश्मीरचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या काझीगुंड शहरातील तापमान उणे २.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. वार्षिक अमरनाथ यात्रेसाठीचे आधार शिबिर असलेल्या पहलगाम येथे उणे ४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. पहलगाम येथे शुक्रवारी रात्री उणे ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान चालू हंगामातील सर्वात कमी तापमान होते. प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथे उणे ३.६ अंश सेल्सिअस, कुपवाडा येथे उणे ३.६ तर कोकरनाग येथे उणे २.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे राजस्थानातील थंडी हळूहळू वाढत असून, शुक्रवारी रात्री सीकर येथे पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. शनिवारी सकाळच्या २४ तासांपर्यंत सीकरमध्ये ५ तर चुरू येथे ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दिल्लीतील हवा पुन्हा बनली विषारी
nप्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने गत तीन दिवस राजधानी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदवण्यात आला होता.
nशनिवारी सकाळी ९ वाजता पुन्हा शहरातील एक्यूआय खराब श्रेणीत म्हणजे २२२ नोंदवण्यात आला. सकाळी साडेआठच्या सुमारास आर्द्रतेची पातळी ८९ टक्के होती.