बेळगाव हे महाराष्ट्रात कधीच विलीन होणार नाही; ते कर्नाटकचाच भाग- मुख्यमंत्री सिद्धरामय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:42 IST2025-11-02T14:41:57+5:302025-11-02T14:42:13+5:30
कोणी गुंडगिरी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल

बेळगाव हे महाराष्ट्रात कधीच विलीन होणार नाही; ते कर्नाटकचाच भाग- मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बंगळुरू: बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. ते कधीच महाराष्ट्रात विलीन होणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर महाजन समितीने दिलेल्या अहवालातील निष्कर्ष हे अंतिम आहेत. त्यामुळे बेळगाव प्रश्नावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सिद्धरामय्या म्हणाले की, बेळगावच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असला तरी आम्ही बेळगाव कोणालाही देणार नाही, ते कर्नाटकचे अविभाज्य अंग आहे.
‘महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक कन्नडिगच’
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, पूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पाच आमदार निवडून येत असत. परंतु, आता त्यांची संख्या शून्यावर आली आहे. या समितीचे लोकही कन्नडिगच आहेत. मात्र, कोणी गुंडगिरी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
केरळ गरिबीमुक्त, मुख्यमंत्र्यांची घोषणा
तिरुवनंतपूरम : केरळ गरिबीमुक्त राज्य झाल्याची घोषणा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी विधानसभेत केले. केरळ राज्याच्या स्थापना दिनानिमित्त बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने मुख्यमंत्री विजयन करत असलेला दावा फसवा असल्याचा आरोप केला आहे. डावी लोकशाही आघाडी सरकार फसणूक करीत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी विशेष अधिवेशनातून सभात्याग केला.
केरळ सरकारच्या प्रयत्नातून ६२ लाख कुटुंबांना कल्याणकारी पेन्शन, ४३ लाख कुटुंबांना मोफत आरोग्य विमा वाटप करण्यात आले. त्यामुळे राज्याला दारिद्र्यमुक्त करता आल्याचे विजयन यांनी स्पष्ट केले.