याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 10:52 IST2024-10-28T10:50:21+5:302024-10-28T10:52:01+5:30
योगी हिंदू एकतेवर सातत्याने भर देत आहेत. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या बातम्यांवर योगींनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली. या घोषणेला रा. स्व. संघाने पाठबळ दिले आहे.

याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे
नवी दिल्ली : निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजपातील सख्य जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले. ‘भाजप आता पूर्ण सक्षम आहे’ असे नड्डा यांनी म्हटले होते. त्यावर संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ‘नड्डांच्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसतो’, असे म्हणत हा विषय संपवला. संघ-भाजपात सारे सुरळीत असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू एकतेच्या हाकेवरही संघाने शिक्कामोर्तब केले.
प्रत्येक संघटनेने शक्ती वाढवलीच पाहिजे. निवडणुकीचा ठेका संघाला देऊन टाकला म्हणजे झाले, असे व्हायला नको. आमच्या एका भावाने ही भावना मांडली, आम्हाला काहीच वाटले नाही. उलट आम्ही त्यांच्या घरी जाऊन भोजन केले. असे छोटे-मोठे काही घडले तर कुठे कशी मलम-पट्टी करायची ते आम्हाला चांगले माहिती आहे, असे ते म्हणाले.
संघाचेही पाठबळ
योगी हिंदू एकतेवर सातत्याने भर देत आहेत. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या बातम्यांवर योगींनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली. या घोषणेला रा. स्व. संघाने पाठबळ दिले आहे.
सहकार्यवाह होसबळे म्हणाले, ‘हिंदू समाज एकसंध राहिला नाही तर आजच्या भाषेत असे घडू शकते. जातीच्या आधारे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे सुरू असलेले प्रयत्न हा अशाच षडयंत्राचा भाग आहे.’
गेल्या ५ ऑक्टोबर रोजी ठाण्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकतेचे महत्त्व सांगितले होते. याच दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजस्थानात बोलताना हाच मुद्दा मांडला होता.