भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 18:20 IST2024-11-05T18:18:34+5:302024-11-05T18:20:06+5:30
डॉक्टरने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून एका महिलेचं ऑपरेशन केलं. ऑपरेशननंतर २४ तासांनी महिलेचा मृत्यू झाला.

भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका बनावट डॉक्टरने क्लिनिक उघडलं आणि गर्भवती महिलांचं ऑपरेशन करण्याची आणि प्रसूतीची जबाबदारी घेतली. गरीब कुटुंबातील महिला या बनावट डॉक्टरच्या जाळ्यात अडकल्या. पण याच दरम्यान भयंकर प्रकार घडला. डॉक्टरने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून एका महिलेचं ऑपरेशन केलं.
ऑपरेशननंतर २४ तासांनी महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर या डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. बेगुसराय जिल्ह्यातील खोदवंदपूर ब्लॉकमध्ये ही घटना घडली. राजनंदनी क्लिनिक नावाने बनावट डॉक्टरने हॉस्पिटल सुरू केलं. या हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांचे फोटो लावण्यात आले होते आणि हे हॉस्पिटल रजिस्टर्ड असल्याचा दावा करण्यात आला होता.
चेरिया बरियारपूर ब्लॉकमधील अर्जुनटोल गावातील ३० वर्षीय अमृता कुमारीला तिच्या कुटुंबीयांनी या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. २ नोव्हेंबरला दाखल झालेल्या अमृताचा ५ नोव्हेंबरला संध्याकाळी मृत्यू झाला. तिची बहीण काजल कुमारी हिने सांगितलं की, "यूट्यूबवर व्हिडीओ पाहून डॉक्टर ऑपरेशन करत होता. गेल्या २४ तासांपासून ही शस्त्रक्रिया सुरू होती."
"आज जेव्हा बहिणीची प्रकृती आणखी जास्त बिघडू लागली आणि तिचा मृत्यू झाला तेव्हा डॉक्टर बाईकवरून पळून गेला." यानंतर कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खोदवंदपूर ब्लॉक मुख्यालयात अनेक बनावट रुग्णालये सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्णालये स्थानिक डॉक्टरांशी जोडलेली आहेत.