सावधान, बाजारात बोगस बियाण्यांचा भरमार!
By Admin | Updated: May 11, 2014 18:30 IST2014-05-11T18:03:24+5:302014-05-11T18:30:53+5:30
कृषी विभागाने दक्षता घ्यावी- विभागीय आयुक्तांचे आदेश

सावधान, बाजारात बोगस बियाण्यांचा भरमार!
राजरत्न शिरसाट, अकोला : खरीप हंगाम जवळ येताच बाजारात बोगस व बेकायदेशीर बियाण्यांची आवक सुरू झाली असून, शेतकर्यांना शुद्ध व दर्जेदार बियाणे मिळावे, यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे आदेश विभागीय महसूल आयुक्तालयाकडून पश्चिम विदर्भातील कृषी अधिकार्यांना देण्यात आले आहेत. बियाणे खरेदी करताना शेतकर्यांनासुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे.
सोयाबीन व बीटी कापसाचे बोगस व बेकायदेशीर बियाणे बाजारात आल्याची माहिती कृषी विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे कापूस बियाणे खरेदी करताना शेतकर्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. अतिवृष्टीमुळे मागील वर्षी सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्यांच्या तुटवड्याची शक्यता आहे. तर यावर्षी कापसाचे झालेले एकरी १० ते १२ क्िंवटलचे उत्पादन बघता, येत्या खरीप हंगामात कापूस पेरा वाढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर शेतकर्यांनी बियाणे खरेदीचे नियोजन केले आहे. बर्याच शेतकर्यांनी आतापासूनच बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. तथापि बाजारात आरआर, राऊंडअप बीटी, तणावरची बीटी, वीडगार्ड बीटी असे अनेक बोगस व बेकायदेशीर बीटी कापसाचे बियाणे आले आहे. हे बियाणे जास्त दराने विकले जाण्याची शक्यता आहे.
हे बियाणे अधिकृत नसून, या बियाण्यांना विकण्याची शासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांनी घाई न करता अधिकृत परवानाधारकाकडूनच बियाणे खरेदी करावे. तसेच पाकिटावर सरकारमान्य चिन्ह आहे का, हे तपासूनच बियाणे खरेदी करावे लागणार आहे.