त्रिपुरा सरकार बांगलादेशला अंधारात ठेवणार? 200 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:01 IST2024-12-23T17:00:55+5:302024-12-23T17:01:26+5:30
बांगलादेश थकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्यास त्रिपुरा सरकार वीजपुरवठा बंद करेल का? असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी अद्याप असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले.

त्रिपुरा सरकार बांगलादेशला अंधारात ठेवणार? 200 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत
बांगलादेशाकडेत्रिपुराचे 200 कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. यासंदर्भात त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी माहिती दिली. तसेच, शेजारील बांगलादेशाचावीजपुरवठा बंद करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही माणिक साहा यांनी सांगितले.
दरम्यान, एनटीपीसी इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे त्रिपुरा राज्य इलेक्ट्रिसिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड बांगलादेशाला 60-70 मेगावॅट वीज पुरवठा करते. यासाठी बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डासोबत करार करण्यात आला आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत माणिक साहा म्हणाले, "बांगलादेशने आम्हाला वीज पुरवठ्यासाठी जवळपस 200 कोटी रुपये दिलेले नाहीत. थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. आम्हाला आशा आहे की, ते त्यांची थकबाकी भरतील जेणेकरून वीजपुरवठा खंडित होणार नाही."
याचबरोबर, बांगलादेश थकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्यास त्रिपुरा सरकार वीजपुरवठा बंद करेल का? असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी अद्याप असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, त्रिपुरामध्ये वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी अनेक यंत्रसामग्री बांगलादेशातून किंवा चितगाव बंदरातून आणण्यात आली होती. अशा परिस्थितीत कृतज्ञता म्हणून त्रिपुरा सरकारने करारानंतर देशात वीजपुरवठा सुरू केला. मात्र, बांगलादेशने थकबाकी भरली नाही, तर आम्ही किती काळ वीजपुरवठा सुरू ठेवू, हे मला माहित येत नाही, असे माणिक साहा म्हणाले.