केरळमधील शाळेत स्वातंत्र्यदिनीच 'वंदे मातरम्'वर बंदी
By Admin | Updated: August 15, 2014 15:27 IST2014-08-15T15:25:30+5:302014-08-15T15:27:34+5:30
'वंदे मातरम्' या गीतामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याच्या कारणावरुन केरळमधील एका शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातून 'वंदे मातरम्' हे गीत वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

केरळमधील शाळेत स्वातंत्र्यदिनीच 'वंदे मातरम्'वर बंदी
तिरुअनंतपूरम, दि. १५ - 'वंदे मातरम्' या गीतामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याच्या कारणावरुन केरळमधील एका शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातून 'वंदे मातरम्' हे गीत वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक संघटनेच्या दबावापुढे शाळा प्रशासनाने नमते घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.
तिरुअनंतपूरमपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्लम येथे टीकेएम सेंटेनरी शाळा आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी 'वंदे मातरम्' या गीतावर नृत्य करणार होते. मात्र यावर सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेने आक्षेप घेतला. कार्यक्रमात हे गीत लावल्यास कार्यक्रमच उधळून लावू असा धमकीवजा इशाराच या संघटनेने शाळा प्रशासनाला दिला होता. 'या गीतामुळे धार्मिक भावना दुखावतात अशा तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. म्हणूनच आम्ही विरोध दर्शवला' असे संघटनेचे पदाधिकारी ए.के.सलाहुद्दीन यांनी सांगितले.
संघटनेच्या दबावापुढे नमते घेत शाळा प्रशासनानेही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातून हे गीतच वगळले. तसेच कार्यक्रमातील नृत्यांमधील 'नमस्ते' करण्याची स्टेपही वगळण्यात आली. शाळा प्रशासनाच्या या कृत्यावर केरळमध्ये तीव्र नाराजी व्यक्त असून विद्यार्थी संघटनांनी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शाळेचे व्यवस्थापक के. अब्दूल माजीद म्हणाले, शाळेतील तीन वर्षांच्या मुलांवर दबाव येऊ नये यासाठी आम्ही हे गीत वगळले. बाहेरच्या संघटनांपुढे आम्ही नमते घेतले नाही. मात्र तीन वर्षांच्या या चिमुकल्यांवर 'वंदे मातरम्' गीतावर नृत्य केल्याने काय दबाव येतो हे ते सांगू शकले नाही.