बाळासाहेब थोरातांना आचारसंहितेमुळे दिल्लीमध्ये नाकारले सरकारी वाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 05:55 IST2020-01-11T05:54:46+5:302020-01-11T05:55:01+5:30
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना शुक्रवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला.

बाळासाहेब थोरातांना आचारसंहितेमुळे दिल्लीमध्ये नाकारले सरकारी वाहन
नवी दिल्ली : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना शुक्रवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला. आचारसंहितेचे कारण देत महाराष्ट्र सदन प्रशासनाने थोरात यांना वाहन नाकारले. त्यामुळे थोरात यांची गैरसोय झाली. विरोधाभास म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्याकडून नव्या महाराष्ट्र सदनात राहण्यासाठी मात्र राजशिष्टाचारानुसार केवळ ५०० रुपये शुल्क घेण्यात आले.
थोरात पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी आले होते. विमानतळ ते महाराष्ट्र सदन, सदन ते काँग्रेस नेत्यांचे निवासस्थान कार्यालयात यासाठी थोरात यांनी खासगी वाहन वापरले. सदनातील अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे पत्र दाखविले. पत्रात 'रेस्ट हाऊस' आचारसंहितेच्या काळात वापरता येणार नाही, असा उल्लेख आहे. मात्र वाहनाचा उल्लेख नाही. त्यामुळे सदनातील कक्षात राजशिष्टाचाराचा लाभ थोरात यांना घेता येणार नव्हता. मात्र त्यांना सवलतीच्या दरात त्यांना कक्ष दिले आणि वाहन मात्र नाकारले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० नोव्हेंबरला दिल्लीत आले, तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती. फडणवीस कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते. मात्र त्यांना बुलेटप्रूफ गाडी, मुख्यमंत्र्यांचा कक्ष आणि संपूर्ण राजशिष्टाचार देण्यात आला.
>प्रचारासाठी आलो नव्हतो
सरकारी नियम असतात पण ते केव्हा लागू करायचे, याचा विचार व्हायला हवा. मी दिल्लीत प्रचारासाठी आलो नव्हतो. त्यामुळे मला सरकारी वाहन मिळायला हवे होते.
- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री