बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! ढाब्याची भिंत कोसळली; महिलेचा मृत्यू, १० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:23 IST2025-07-08T11:23:16+5:302025-07-08T11:23:45+5:30
छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाममध्ये पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर १० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

फोटो - ndtv.in
मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाममध्ये पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर १० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ३ वाजताच्या सुमारास ढाब्याची भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकल्याने उत्तर प्रदेशातील एका महिला भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. जखमींमध्ये ७ जण उत्तर प्रदेशचे आणि एक उत्तराखंडचा असल्याचं सांगितलं जात आहे.
सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर आहे. बागेश्वर धाममध्ये दर्शनासाठी आलेले भाविक रात्री भाड्याने घेतलेल्या ढाब्यात राहिले. रात्री झोपेत असताना ३.३० वाजताच्या सुमारास ढाब्याची भिंत कोसळली आणि सर्वजण ढिगाऱ्याखआली गाडले गेले. लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवळील लोक तिथे पोहोचले आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं.
बागेश्वर धाममधील ढाब्याची भिंत कोसळल्याने उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील अदलाहट येथील रहिवासी राजू यांच्या पत्नी अनिता देवी यांचा मृत्यू झाला, तर मुन्शीलाल कश्यप, पूनम देवी, बीना देवी, मंजू देवी, अरविंद कुमार पटेल, प्रिया कुमारी, अंशिका कुमारी, कौशल सोनी, गुलाबचंद साहू, धनेश्वरी देवी जखमी झाले. सध्या या सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन मुलींची अवस्था रडून रडून वाईट झाली आहे. मुलींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आई या घटनेनंतर बेपत्ता झाली आहे. ती त्यांना सापडलीच नाही. रात्री सर्वजण झोपले होते. अचानक भिंत कोसळली आणि काही लोक त्याखाली अडकले. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.