रेल्वे प्रवाशांचे 'बुरे दिन', प्रवासी भाड्यात वाढ
By Admin | Updated: June 20, 2014 18:03 IST2014-06-20T17:16:57+5:302014-06-20T18:03:53+5:30
रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्क्यांनी घसघशीत वाढ केली असून आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

रेल्वे प्रवाशांचे 'बुरे दिन', प्रवासी भाड्यात वाढ
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २०- रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारा निर्णय रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी घेतला. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात तब्बल १४.२ टक्के तर मालवाहतुकीत सुमारे ६.५ टक्क्यांनी वाढ केली असून मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
रेल्वे भाडेवाढीचा निर्णय यूपीए सरकारच्या कालावधीतच घेण्यात आला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. जुलैमध्ये रेल्वेचे बजेट सादर होणार असून त्यापूर्वीच भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. जर प्रवाशांनी या भाडेवाढीपूर्वी तिकीट बूक केले असेल तर त्यांना प्रवासादरम्यान गाडीत टीसीला वाढीव भाड्याचे पैसे द्यावे लागणार आहे. रेल्वेची वित्तीय तुट भरुन काढण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. रेल्वेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने रेल्वेचे अनेक प्रकल्प बारळले असेही अधिका-यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनीही टीका केली आहे. आम आदमीच्या विरोधात काम करणारे सरकार असल्याचे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कडू औषध देण्याची वेळ आली आहे असे विधान केले आहे. याद्वारे मोदींनी अर्थव्यवस्थेच्या हितासाठी काही कटू निर्णय घेण्याचे संकेत दिले होते.