बाबरी, गोधरामुळे मनं बिघडली म्हणून तरुण दहशतवादाकडे !
By Admin | Updated: June 13, 2016 07:54 IST2016-06-13T06:22:12+5:302016-06-13T07:54:34+5:30
भारतीय उपखंडात या दहशतवादी संघटनेची (एक्यूआयएस) पाळेमुळे रोवण्याचा चंग बांधून आहेत, असा दावा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

बाबरी, गोधरामुळे मनं बिघडली म्हणून तरुण दहशतवादाकडे !
दिल्ली पोलिसांचा दावा
नवी दिल्ली : इ.स. १९९२ चा बाबरी मशीद विध्वंस आणि २००२ च्या गोधरा दंगलींमुळेच भारतीय तरुण अल कायदा या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित झाले आणि आज हे तरुण भारतीय उपखंडात या दहशतवादी संघटनेची (एक्यूआयएस) पाळेमुळे रोवण्याचा चंग बांधून आहेत, असा दावा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने १७ आरोपींविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायाधीश रितेश सिंग यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपपत्रातील माहितीनुसार विविध मशिदींमध्ये जिहादी भाषण दिल्यावर अटकेतील आरोपी सईद अंजार शाह हा मोहम्मद उमरला (फरार आरोपी) भेटला आणि त्यांनी भारतात मुस्लिमांवर होणारे कथित अत्याचार; प्रामुख्याने गोधरा व बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर चर्चा केली.
शाहच्या विचारांनी उमर प्रभावित झाला व त्याने स्वत:ला जिहादासाठी झोकून दिले. त्याने पाकिस्तानात शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. तो पाकिस्तानातून सर्व कारवायांवर नियंत्रण ठेवायचा.
आरोपी अब्दुल रहमानने पाकिस्तानी दहशतवादी सलीम, मन्सूर आणि सज्जादला भारतात सुरक्षित आश्रय दिला. हे तिघेही जैश-ए-मोहम्मदचे सदस्य होते. इ.स. २००१ साली उत्तर प्रदेशात झालेल्या गोळीबारात ते ठार झाले. तीनही पाकिस्तानी दहशतवादी बाबरी मशीद विध्वंसाचा बदला घेण्यासाठी भारतात आले होते. अयोध्येतील राममंदिरावर हल्ला करण्याची त्यांची योजना
होती.
(वृत्तसंस्था)
>काही जण पाकला गेले
जिहादसाठी काही तरुण पाकिस्तानात गेले आणि तेथे त्यांनी जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख झकी उर रहमान लखवी व इतर जहाल दहशतवाद्यांची भेट घेतली, असेही या आरोपपत्रात नमूद आहे.