CoronaVirus: आधी मदतीची अफवा, आता खरोखरच मदत; विप्रोच्या अझिम प्रेमजींकडून कोट्यवधींचा निधी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 15:01 IST2020-04-01T15:00:24+5:302020-04-01T15:01:03+5:30
Coronavirus विप्रो, अझिम प्रेमजींकडून ११२५ कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर

CoronaVirus: आधी मदतीची अफवा, आता खरोखरच मदत; विप्रोच्या अझिम प्रेमजींकडून कोट्यवधींचा निधी जाहीर
मुंबई: कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातले उद्योगपती पुढे येत आहेत. टाटा, अंबानी यांनी कोट्यवधी रुपयांची मदत केल्यानंतर आता विप्रोकडूनही कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशननं ११२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अझीम प्रेमजी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० हजार कोटी रुपयांची मदत दिल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं होतं. मात्र ते वृत्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं होतं.
कोरोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशननं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. विप्रो लिमिटेडनं १०० कोटी, विप्रो इंटरप्रायझेसनं २५ कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशननं १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरवर्षी विप्रो कंपनी आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशन काही रक्कम सीएसआरच्या माध्यमातून दान करते. मात्र ही रक्कम त्यातील नसून अतिरिक्त असल्याचं विप्रोनं निवेदनातून स्पष्ट केलं आहे.
'कोरोनामुळे माणसांसाठी खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका समाजातल्या मोठ्या वर्गाला बसला आहे. विप्रो आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशनकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीमुळे वैद्यकीय सेवा देण्यास मदत होईल. कोरोनाचा सामना करण्यासाठी काही भागांमध्ये विशेष मदत पोहोचवण्याची नितांत गरज आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांना वैद्यकीय मदत मिळणं अतिशय आवश्यक आहे,' असं विप्रोनं निवेदनात नमूद केलं आहे.
याआधी टाटांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी १५०० कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर केलं आहे. रविवारी त्यांनी ही घोषणा केली. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट मिळून १५०० कोटी रुपये देणार आहेत. यातील एक हजार कोटी टाटा सन्स देणार असून उर्वरित ५०० कोटी टाटा ट्रस्ट देणार आहे. तर उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे.