रक्षाबंधनाच्या दिवशी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एका रिक्षाचालकाने फूट ओव्हर ब्रिजवरून रिक्षा चालवली आहे. ही घटना हमदर्द नगर संगम विहार सर्कल रेड लाईटजवळ घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याची दखल घेत दिल्ली पोलिसांनी वाहन जप्त केलं असून रिक्षाचालकाला अटक केली आहे. अटक केलेल्या रिक्षाचालकाचे म्हणणे आहे की, आईची तब्येत खूपच खराब होती आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करायचे होते, त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हमदर्द नगरचा आहे. यामध्ये ऑटोचालक मुन्ना (25) याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते. सामान्य पादचाऱ्यांसाठी बांधलेल्या फूट ओव्हर ब्रिजवर रिक्षा नेण्यासाठी अमित या आणखी एका व्यक्तीनेही त्याला मदत केली, त्याला अटकही करण्यात आली आहे. रिक्षा चालकाने फूट ओव्हर ब्रिजवर रिक्षा नेण्याचा प्रयत्न केला असता पुलावर उपस्थित असलेले लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 15 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये रिक्षामध्ये दोन लोक असल्याचं स्पष्ट झालं आहे, ड्रायव्हरला मदत करणारा अमितही रिक्षा ढकलल्यानंतर आत बसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आणि चालकासह दोघांना अटक केली. दोघेही दिल्लीतील संगम विहार येथील असल्याचे सांगण्यात येत असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.