साडेचार लाख बेरोजगारांसाठी अवघे ९२३ रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:38 IST2019-12-30T03:12:08+5:302019-12-30T06:38:08+5:30
गेल्या दीड वर्षांत अवघ्या अडीच हजार व्यक्तींनाच रोजगार

साडेचार लाख बेरोजगारांसाठी अवघे ९२३ रोजगार
नवी दिल्ली : सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्रालयाच्या (एमएसएमइ) वतीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या संपर्क पोर्टलवर डिसेंबरअखेरीस तब्बल ४ लाख ६० हजार बेरोजगार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. मात्र, त्या पैकी अवघ्या ९२३ जणांना रोजगार संधी उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, गेल्या दीड वर्षांत अवघ्या अडीच हजार व्यक्तींनाच या पोर्टलद्वारे रोजगार उपलब्ध झाला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जून २०१८मधे या पोर्टलची सुरुवात करण्यात आली होती. कंपन्या आणि काम शोधू इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये संपर्काचा पूल या निमित्ताने बांधला गेला होता. बेरोजगार आणि शिक्षण घेत असलेल्या १८ वर्षे वयाच्या उमेदवारांना या पोर्टलवर नोंदणी करता येते. त्यावर आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार मिळविण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, डिसेंबरअखेरीस २ हजार ५२८ व्यक्तींना या पोर्टलद्वारे रोजगार मिळाला आहे. म्हणजेच महिना सरासरी दीडशेहून कमी व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. या पोर्टलवर पाच हजारांहून अधिक कंपन्यांनी नोदणी केलेली आहे. मात्र, मोठे उद्योग अथवा संस्था, तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या त्यावर नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच तुलनेने कमी रोजगार उपलब्ध होत असल्याचे सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्रालातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.