अवध ओझा राजकारणात करणार एन्ट्री! कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:01 IST2024-12-02T11:59:26+5:302024-12-02T12:01:41+5:30
प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अवध ओझा हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याचे दिल्लीतील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

अवध ओझा राजकारणात करणार एन्ट्री! कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
उत्तर प्रदेशातील गोंडा येथील असलेले अवध ओझा हे युपीएससी शिक्षक आणि वक्ते आहेत. युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ते ओझा सर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचं पूर्ण नाव अवध प्रताप ओझा असे आहे.
अवध ओझा यांचं प्राथमिक शिक्षण गोंडामध्ये झाले. त्यांनी पदवीचे शिक्षण गोंडातील फातिमा इंटर कॉलेजमधून पूर्ण केले.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आज (२ डिसेंबर) पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत केजरीवाल शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करणार असून, याच परिषदेत अवध ओझा यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली जाण्याची चर्चा आहे.
फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणूक
दिल्लीमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे राजकारण तापू लागलं आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी, भाजप, काँग्रेस या सर्वच पक्षांनी निवडणुकीवर लक्ष केले आहे.
दिल्लीची सत्ता कायम राखण्याचे आव्हान आम आदमी पार्टीसमोर आहे. त्यामुळे केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आपने आधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणाही आपकडून करण्यात आली आहे.