सरकारी योजनेचा निषेध करत चालकाने स्वतःचीच ऑटो जाळली, आत्मदहनाचाही प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 10:32 IST2024-02-02T10:31:31+5:302024-02-02T10:32:10+5:30
राज्यातील विविध भागातील ऑटोरिक्षा चालक सरकारच्या 'महालक्ष्मी' योजनेला विरोध करत आहेत.

सरकारी योजनेचा निषेध करत चालकाने स्वतःचीच ऑटो जाळली, आत्मदहनाचाही प्रयत्न
हैदराबाद : तेलंगणात महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मोफत बस प्रवास योजनेला ऑटोरिक्षा चालकांनी तीव्र विरोध केला आहे. वृत्तानुसार, या योजनेला विरोध करत एका चालकाने हैदराबादमधील प्रजा भवनाजवळ स्वतःची ऑटोरिक्षाच पेटवून दिली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.
यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये एका चालकाने आपल्या ऑटोला आग लावून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला तसे करण्यापासून रोखले. पोलिसांनी महबूबनगर येथील ४५ वर्षीय ऑटो चालकाला ताब्यात घेतले आहे.
ऑटोरिक्षाला आग लावणाऱ्या चालकाचे नाव देवा असे आहे. तो ऑटोरिक्षा घेऊन गजबजलेल्या बेगमपेट भागातील प्रजा भवन गेला. या ठिकाणी ऑटोरिक्षाला पेटवून दिले. तसेच, यावेळी त्याने आत्मदहनाचाही प्रयत्न केला, पण सतर्क पोलिसांनी त्याला रोखले. दरम्यान, आगीत ऑटोरिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली.
राज्यातील विविध भागातील ऑटोरिक्षा चालक सरकारच्या 'महालक्ष्मी' योजनेला विरोध करत आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना राज्यभरात तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (TSRTC) बसमधून मोफत प्रवास करता येतो. सत्तेत आल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार ही योजना सुरू केली.
या योजनेमुळे ऑटोरिक्षा चालकांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे ऑटोरिक्षा चालकांचे म्हणणे आहे. नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी. या मागणीसाठी ऑटोरिक्षा चालकांनी विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली आहेत.