Atul Subhash Suicide Case: बंगळुरुमधील आयटी इंजिनीअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. पती-पत्नीमधील तणाव कोणत्या थराला पोहोचू शकतो, यावरही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कलम 498(अ) देखील वादाच्या केंद्रस्थानी आहे. अनेकांनी या प्रकरणावर भाष्य केले असून, आता भाजप खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
''या घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. अशा प्रकरणांचा आढावा घेतला पाहिजे. अशा घटनांना तोंड देण्यासाठी स्वतंत्र संस्था असावी. अतुल सुभाष यांचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. लग्नासारख्या गोष्टीला लोकांनी धंदा बनवले, तर हे निषेधार्ह आहे. तरुणांवर अशा प्रकारचा भार टाकू नये. त्यांनी दबावाखाली येवून हे पाऊल उचलले आहे," अशी प्रतिक्रिया कंगना राणौत यांनी दिली.
कोण आहे अतुल सुभाष, काय आहे प्रकरण?अतुल सुभाष नावाच्या आयटी इंजिनीअरने दोन दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अतुल जौनपूर, यूपीचा रहिवासी असून, सध्या बंगळुरुमध्ये नोकरी करायचा. अतुल सुभाषने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींवर पैशांसाठी त्रास दिलाचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. आत्महत्येपूर्वी अतुलने 24 पानी सुसाईड नोटही लिहिली आहे. यातून त्याने आपल्यावरल होणाऱ्या मानसिक अत्याचाराचा लेखाजोखा मांडला आहे.
काय आहे कलम 498(अ)?भारतीय दंड संहिताच्या कलम '498 अ' मध्ये एखाद्या महिलेवर तिचा पती किंवा त्याच्या घरच्यांनी केलेल्या अत्याचारासाठी शिक्षेची तरतूद आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्यसभा खासदार ममन कुमार मिश्रा म्हणतात, "सर्वांना माहितीये की, सध्या '498अ'चा गैरवापर होत आहे. या कायद्याद्वारे पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला जातो."
"या कायद्यातील तरतुदींमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. या कायद्याला जामीनपात्र करायला पाहिजे. घरात किरकोळ भांडण झाले की, महिला 498 (अ) नुसार गुन्हा दाखल करतात. काही महिलांनी याचा गैरवापर सुरू केल्यामुळे सर्व महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते," असे ममन मिश्रा म्हणाले.