Delhi CM Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याच्या कट रचल्याप्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या सिव्हिल लाईन्स या सरकारी निवासस्थानी जनसुनावणी दरम्यान हल्ला करण्यात आला. जनसुनावणीदरम्यान राजेश साकारिया या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राजेशला पकडले. या हल्ल्यापूर्वी राजेशने रेखा शर्मा यांच्या घराची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. दरम्यान, आता आरोपी राजेश हा रेखा शर्मा यांच्यावर चाकूने हल्ला करणार होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, चौकशीदरम्यान हल्लेखोर राजेश भाई खिमजी भाई सकारिया याने एक खळबळजनक खुलासा केला. राजेशने पोलिसांना सांगितले की त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर चाकूने हल्ला करण्याची योजना आखली होती. पण कडक सुरक्षा व्यवस्था पाहून त्याने सिव्हिल लाईन्स परिसरात चाकू फेकून दिला. रेखा गुप्ता यांच्या सरकारी निवासस्थानी जाण्यापूर्वी तो सुप्रीम कोर्टातही गेला होता, पण तिथेही कडक सुरक्षा पाहून तो परतला.
२१ ऑगस्ट रोजी आरोपी राजेश भाई खिमजीला पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले. राजेश खिमजी हा मूळचा गुजरातमधील राजकोट येथील आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या जनसुनावणीच्या वेळी त्याने हल्ला केल्यानंतर लगेचच त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना चापट मारली आणि त्यांचे केस ओढून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी खिमजीविरुद्ध सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, रविवारी या प्रकरणात पोलिसांनी हल्लेखोराच्या मित्राला अटक केली आहे. पोलिसांनी हल्लेखोर राजेशचा मित्र तहसीन याला राजकोट येथून अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेदरम्यान राजेश त्याचा मित्र तहसीन याच्या सतत संपर्कात होता. आरोपीच्या राजकोट येथील मित्राने त्याला मदत करण्यासाठी पैसे पाठवले होते.
दुसरीकडे, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना देण्यात आलेली केंद्रीय राखीव पोलिस दलाची झेड श्रेणीची सुरक्षा केंद्राने काढून घेतली आहे. गुप्ता यांच्यावरील हल्ल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना ही सुरक्षा देण्यात आली होती. सोमवारी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पुन्हा दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे.