पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठात आज पश्चिम बंगाल कॉलेज अँड विद्यार्थी प्रोफेसर असोसिएशनच्या बैठकीदरम्यान तुफान राडा झाला. या बैठकीसाठी शिक्षणमंत्री ब्रत्य बसू हे उपस्थित राहणार होते. मात्र ते येण्यापूर्वीच विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेण्याची मागणी करत डाव्या विद्यार्थी संघटना आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना घेरले, तसेच त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, पश्चिम बंगाल कॉलेज अँड विद्यार्थी प्रोफेसर असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांना तिथून जाण्यास सांगितले. मात्र त्यामुळे तणाव आणखीनच वाढला. तसेच आंदोलक विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यादरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री ब्रत्य बसू यांच्या कारला रोखले. तसेच कारच्या टायरची हवा सोडून कारची मोडतोड केली.
आंदोलक विद्यार्थी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी मंत्रिमहोदयांना सुमारे २ तास ओलीस धरत ताब्यात ठेवले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा धक्काबुक्की झाली. तसेच त्यात एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली.